जाहिरात
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / स्मशानात राहणारा 'भुताचा भाऊ', एका अवलियाची ही अफलातून कहाणी

स्मशानात राहणारा 'भुताचा भाऊ', एका अवलियाची ही अफलातून कहाणी

स्मशानात राहणारा 'भुताचा भाऊ', एका अवलियाची ही अफलातून कहाणी

कुणी त्याला भुताचा भाऊ म्हणतं तर कुणी देवचार. कारण तो राहतोयच स्मशानात ! आणि ते ही गेली 18 वर्षं ! पण का वेळ आली त्याच्यावर स्मशानात राहण्याची ? आणि कसं आहे त्याचं स्मशानातलं जीवन ? बघुया सिंधुदुर्गातल्या चंद्रकांत लाड या अवलियाची ही अफलातून गोष्ट…

  • -MIN READ
  • Last Updated :

     दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग 02 आॅगस्ट : कुणी त्याला भुताचा भाऊ म्हणतं तर कुणी देवचार. कारण तो राहतोयच स्मशानात ! आणि ते ही गेली 18 वर्षं !  पण का वेळ आली त्याच्यावर स्मशानात राहण्याची ? आणि कसं आहे त्याचं स्मशानातलं जीवन ? बघुया सिंधुदुर्गातल्या चंद्रकांत लाड या अवलियाची ही अफलातून गोष्ट… नाव :  चंद्रकांत लाड. वय : 78 वर्षे. पत्ता : खुटवळवाडी स्मशान. तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.   जुनी SSC झालेल्या चंद्रकांत लाड यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यामुळे त्याना घराबाहेर पडावं लागलं. मुंबईत पेंटिंगची किरकोळ कामं करून गुजराण करीत असताना त्यांच्या पत्नीचा अर्धांगवायूने मृत्यू झाला. एकाकी फिरणाऱ्या लाड यांना भयंकर काविळीने गाठलं आणि एका पावसाळ्यात ते गावी परतले. पण गावी त्याना कुणीच आसरा दिला नाही. " आता जायाचा कुठे पावसात.. घरी तर जाऊन फायदाच नव्हता, मला कोण घेत नव्हतं. मग मी परत खुटवळात आलो. विचार केला. बाबा आता जगणार तरी कसा. एरवी तर मरणार…बघुया स्मशानभूमीत जाऊन राहुया… बघुया किती भुताटकी आहे ती..प्रयोग तरी होईल आपला.मेलो तर मेलो जगलो तर स्मशानातच जगलो" असा अनुभव लाड सांगताय. मुळात भीतीचा कुठलाही लवलेश नसणारं लाड यांचं कफल्लक जगणंच अंधश्रद्धा निर्मूलनाचं जिवंत उदाहरण आहे, भूताखेतांची बाधा झाल्याचं भासवून सर्वसामान्य माणसाची लूट करणाऱ्यांवर ते कडाडून हल्ला चढवतात. चंद्रकांत लाड म्हणतात, “ही अंधश्रधेवाली माणस फसवणूक करून भीती घालतात. मग ती आणखीनच घाबरतात. असले नसले तरी पैसे काढून यांना देतात .काहीतरी करून याना अद्द्ल घडवायला पाहिजे त्याना अटक करून बेड्या घातल्या पाहिजेत. ही जर फसवणूक नाही थांबली तर लोकांचा छळ आणखी होत राहणार” स्मशानात जळणाऱ्या चितांनी लाड त्याना खूप काही शिकवलxय. म्हणूनच जळालेल्या चितेची राख त्याना आपण रुजवून आणलेल्या हिरव्या भाज्यांसाठी खत म्हणून वापरावीशी वाटते. चितेतल्या जळत्या लाकडावरच आपली चूल पेटवावीशी वाटते आणि  पांढऱ्या शुभ्र कागदावर चित्रंही काढावीशी वाटतात. ना कुठल्या कर्मकांडावर विश्वास ना पुनर्जन्मावर ! “जन्माचे दिवस आता मी भोगत आहे .आता मृत्यू जवळ जवळ येत आहे. पण तो कधी आणि केव्हा येईल सांगता येणार नाही. उद्या आपण मरणार हे आज आम्हाला समजणार नाही” माणूस मेला की खरं तर त्याच्या बऱ्यावाईट आठवणीशिवाय काही शिल्लक उरत नाही. चंद्रकांत लाड यांच्या मृत्यूनंतरही लोक त्यांची आठवण ठेवतील की नाही माहीत नाही. पण हे स्मशान मात्र त्यांची नक्कीच आठवण ठेवेल…

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात