**मुंबई, 15 नोव्हेंबर :**अनेक जण रोज मनःशांती आणि सुख समृद्धीसाठी आराध्य देवतेची पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पूजा करतात. सनातन हिंदू धर्मात देव-देवतांच्या पूजा-विधीविषयी काही नियम सांगितले आहेत. देवाची पूजा करताना कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, याबाबतची माहितीदेखील शास्त्रांत दिली गेली आहे. देवाच्या पूजेपूर्वी कपाळावर गंध अर्थात टिळा लावला जातो. या मागेदेखील एक शास्त्र आहे. वेगवेगळ्या देवतांच्या पूजेप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचं गंध लावलं जातं. कपाळवर गंध कसं आणि कशाचं लावावं, त्याला धार्मिक महत्त्व काय आहे, तसंच यामुळे संबंधित व्यक्तीला कशाप्रकारे फायदा होतो, या गोष्टी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. `टीव्ही 9 हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. हिंदू धर्मात पूजा करतेवेळी संबंधित व्यक्तीनं कपाळावर गंध लावणं आवश्यक मानलं जातं. वेगवेगळ्या देवी-देवतांच्या पूजेवेळी वेगवेगळ्या प्रकारचं गंध लावलं जातं. जर तुम्ही भगवान शंकराची पूजा करत असाल तर कपाळावर भस्म लावलं जातं. तसंच जर तुम्ही भगवान विष्णुची पूजा करत असाल तर कपाळावर पिवळ्या चंदनाचा टिळा लावणं गरजेचं आहे. देवी-देवतांच्या श्रृंगारासाठी वापरलं जाणारं गंध देवाचा महाप्रसाद मानलं जातं. पूजेत गंधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हेही वाचा - Puja Vidhi : पूजा योग्य असेल तर देव होतात प्रसन्न; या आहेत 3 पद्धती गंधाचा टिळा पवित्र आणि देवाचा प्रसाद मानला जातो. स्नान केल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच अग्निचक्रावर गंधाचा टिळा लावावा, असं धर्मशास्त्र सांगतं. देवाच्या मूर्ती अथवा फोटोला अनामिकेनं म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटानी गंध लावावं तर पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने गंध लावावं. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणतं गंध लावावं या विषयीची माहितीदेखील सनातन धर्मात दिली आहे. सोमवारी महादेव आणि चंद्राचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी पांढऱ्या चंदनाचं गंध लावावं.
मंगळवारी पवनपुत्र हनुमान आणि भूमिपुत्र मंगळाचा आशीर्वाद मिळावा यासाठी लाल चंदन किंवा शेंदुराचा टिळा लावावा. बुधवारी श्री गणपतीच्या कृपादृष्टीसाठी शेंदूराचा टिळा कपाळावर लावावा. गुरु ग्रह आणि भगवान विष्णुंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी गुरुवारी पिवळं चंदन किंवा केशरी टिळा लावावा. दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळावा, यासाठी शुक्रवारी कुंकू किंवा लाल चंदन कपाळावर लावावं. शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी शनिवारी कपाळावर भस्म लावावं. भगवान सूर्याच्या कृपादृष्टीसाठी रविवारी लाल चंदन किंवा कुंकू कपाळावर लावावं. कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते, असं मानलं जातं. गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञा चक्रावर गंध लावल्याने केवळ मनःशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे हिंदू धर्माशी निगडित शैव, वैष्णव आणि शाक्त पंथातील व्यक्ती पूजेवळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात. पूजेत वापरलं जाणारं गंध केवळ कपाळवरच नाही तर डोक्याच्या मध्यभागी, गळ्यावर, हृदयावर, नाभी आणि पाठीवरही लावलं जातं.