जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu Tips : उत्तर दिशेसाठी काय आहेत वास्तूचे नियम? या दिशेला अजिबात ठेवू नका अशा गोष्टी!

Vastu Tips : उत्तर दिशेसाठी काय आहेत वास्तूचे नियम? या दिशेला अजिबात ठेवू नका अशा गोष्टी!

Vastu Tips : उत्तर दिशेसाठी काय आहेत वास्तूचे नियम? या दिशेला अजिबात ठेवू नका अशा गोष्टी!

वास्तुशास्त्राच्या संकेतांनुसार वास्तूची उभारणी केल्यास, तसंच, उभारणीनंतर घरातल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास लाभदायक ठरतं. घरात कोणत्या दिशेला काय असावं आणि कोणत्या दिशेला काय ठेवावं, हे जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 डिसेंबर : वास्तुशास्त्राच्या संकेतांनुसार वास्तूची उभारणी केल्यास, तसंच, उभारणीनंतर घरातल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास लाभदायक ठरतं. घरात कोणत्या दिशेला काय असावं आणि कोणत्या दिशेला काय ठेवावं, हे जाणून घेऊ या. वास्तुशास्त्रात दिशांना मोठं महत्त्व आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार मुख्य दिशा, तर आग्नेय, वायव्य, नैर्ऋत्य, ईशान्य या चार उपदिशा आहेत. प्रत्येक दिशेच्या अनुषंगाने वास्तूविषयी काही नियम आहेत. वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला खूप महत्त्व आहे. ही दिशा लक्ष्मीमाता, तसंच कुबेराची असते, असं मानलं जातं. या दिशेकडून सर्वांत जास्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणूनच पूजाविधी, जप, तसंच योगसाधना आदींसाठी ही दिशा उपयुक्त मानली जाते. ही सर्वांत शुभ दिशा मानली जाते. घरात उत्तरेकडे काय हवं? घरात उत्तर दिशेला तिजोरी ठेवणं शुभ असतं. तसं झालं तर घरात सदैव लक्ष्मीमातेचा वास राहतो, असं म्हणतात. घरात सुखसमृद्धी यावी, यासाठी घराच्या उत्तरेकडे तुळशीचं झाड आवर्जून लावावं. उत्तरेकडे मनी प्लांट लावणंही खूप शुभ मानलं जातं. उत्तरेकडे आरसा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. उत्तरेकडे अभ्यासाचं टेबल अवश्य ठेवावं. घराच्या उत्तरेकडच्या भिंती फिकट निळ्या रंगाने रंगवाव्यात, असा संकेत आहे. ते शुभ मानलं जातं. उत्तरेकडे काय नको? घरात उत्तरेकडे कधीही चपला, पादत्राणं ठेवू नयेत. तसं केल्यास व्यक्तीच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात. उत्तर ही लक्ष्मीमाता आणि कुबेराची दिशा मानली जाते. भगवान कुबेर म्हणजे तर सुखसमृद्धीची देवता. त्यामुळे या दिशेला चपला ठेवू नयेत. तसंच, घरात उत्तरेकडे कचरा, अडगळ, तुटलेल्या वस्तू आदी ठेवू नयेत. या दिशेला कचरापेटी असू नये. उत्तरेकडे शौचालयही असू नये. कारण उत्तरेकडून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. त्यामुळे तिथे शौचालय असणं हा सर्वांत मोठा वास्तुदोष मानला जातो. ज्या घरांत उत्तरेकडे शौचालय असतं, तिथे कायम आर्थिक समस्या असतात. हा वास्तुदोष असला, तर घरात लक्ष्मीचं वास्तव्य असत नाही. एखाद्या घरात उत्तरेकडे शौचालय असेल आणि तो दोष दूर करायचा असेल, तर काचेच्या एका ग्लासात सैंधव मीठ भरावं आणि तो ग्लास बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवावा. थोड्या दिवसांनी त्यातलं मीठ बदलत राहावं. या उपायाने हा वास्तुदोष दूर होऊ शकतो. उत्तरेकडे कायम वजनाला हलक्या वस्तूच ठेवायला हव्यात. पलंग किंवा जड फर्निचर उत्तरेकडे ठेवू नये. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेच्या घरात प्रवेशाला अडथळा निर्माण होतो. लक्ष्मीमातेची कृपा होण्यासाठी घरात ही दिशा मोकळी असली पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात