काकीनाडा, 18 जुलै : आंध्र प्रदेशातल्या कोरुकोंडा शेतकऱ्यांनी कोटी गोटी तलंब्रलू (नखांचा वापर करून भाताच्या ओंब्यातून तांदळाचे एक कोटी दाणे काढणं) तयार करण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य संगमाच्या मदतीने भात पिकाची लागवड सुरू केली.
हे शेतकरी दर वर्षी तेलंगणमधल्या भद्राचलम इथे भगवान श्रीराम आणि सीतादेवीच्या वार्षिक स्वर्गीय विवाह सोहळ्यासाठी तलंब्रलू पाठवत असतात. यासाठी आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या गोकावरम मंडलातल्या अच्युतापुरम गावातल्या शेतात भाताची लागवड केली जाणार आहे.
सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. शेतकरी आपल्याकडील उत्पादित संपूर्ण भातपीक या सोहळ्यासाठी देतात. ही परंपरा आजच्या काळातही श्रद्धापूर्वक जपली जात आहे.
श्रीकृष्ण चैतन्य संगमाचे अध्यक्ष कल्याणम् अप्पा राव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी शेतात नुकतीच भाताची लागवड सुरू केली. यासाठी शेतकऱ्यांनी आपला पोशाख बदलून भगवान श्रीराम, हनुमान, अंगद, सुग्रीव आणि जांबुवतांसारखा पेहराव केला.
लागवडीला सुरुवात करण्यापूर्वी देवांच्या रूपातल्या भाविकांनी शेतातच भाताचे बियाणं अर्पण करून भगवान श्रीराम आणि सीतादेवीच्या मूर्तींना अभिषेक केला. कल्याणम् अप्पा राव यांच्या वैदिक मंत्रोच्चारणादरम्यान जय श्रीराम असा नारा देऊन सर्वांनी मूर्तींना प्रदक्षिणा घातली.
`शेतकऱ्यांनी भगवान श्रीराम आणि सीतादेवी यांच्याप्रती भक्तिभाव दाखवण्याची ही एक जुनी परंपरा आहे. दर वर्षी न चुकता ही परंपरा पाळली जाते. कोटी गोटी तलंब्रलू तयार करण्यासाठी शेतकरी उत्पादित झालेलं सगळं पीक देतात. भद्राचलमला भगवान श्रीराम आणि सीतादेवीचा स्वर्गीय विवाहसोहळा मार्च किंवा एप्रिल महिन्यात होणार आहे.
दरवर्षी या विवाहसोहळ्यासाठी तलंब्रलू पाठवण्यात आम्हाला धन्यता वाटते,` असं श्रीकृष्ण चैतन्य संगमचे अध्यक्ष कल्याणम् अप्पा राव यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांनी ही पारंपरिक आणि अनोखी श्रद्धा अजूनही जपली आहे. हे संपूर्ण भातपीक या सोहळ्यासाठी वापरलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.