नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा : मेन्यू फिक्स आणि टेबलही फिक्स मात्र नाश्ता वेगळा, आठवड्यातले दोन दिवस माकड चक्क पेटपुजा करायला एका हॉटेलमध्ये न चुकता येतं. बिल न भरता पोटभर खातं आणि निघून जातं. ही गमतीशीर वाटली तरी खरी गोष्ट आहे. उन्हाळा बघता सर्वत्र वातावरण तापत असून चारा व पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे याचा फटका जंगलात तसेच आजूबाजूचा परिसरात वावरणाऱ्या माकडांना देखील बसत आहे.
काही माकडे आपला कळप सोडून शहरात मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडतात व आपली तृष्णा भागवितात तर असाच एक वयस्क माकड भंडारा शहर वासियासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माकड थेट हॉटेलात घुसलं, टेबलवर थाण मांडून बसतं आणि मजेत नाश्ता करत आहे.
माकडाचा नाश्त्यावर ताव मारणं चालू आहे. हा त्याचा नित्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून असून हॉटेल मालक देखील तो आल्यावर त्याला नाश्ता व पाणी देतात शिवाय हा माकड कुणालाही इजा न पोहचवता नाश्ता आणि पाणी प्यायल्यानंतर निघून जातो. विशेष म्हणजे हा वानर मंगळवारी आणि शनिवारी फक्त ह्या दोन दिवशीच हॉटेल मध्ये येतो इतर दिवशी तो कुठे जातो , काय खातो याबद्दल याची माहिती कुणालाही नाही त्यामुळे ठराविक दिवशी येणाऱ्या या माकडाला बघण्यासाठी अनेक लोक हॉटेलमध्ये येत असतात.