मुंबई, 07 मार्च : हिंदू धर्मात शंखाला पवित्र मानलं गेलं आहे. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात शंखनाद करणं शुभ मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रात देवपूजेबाबत, परंपरांबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. धर्मशास्त्रानुसार शंख हा भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. शंखात जल घेऊन त्याने श्रीहरी विष्णूला आंघोळ घातल्यास ते भाविकांवर प्रसन्न होतात. तसंच भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. समुद्रमंथनात जी 14 रत्नं सापडली, त्यात शंखदेखील होता असं म्हटलं जातं. हिंदु धर्मशास्त्रानुसार शंखाची पूजा कशी करावी याचे काही नियम आहेत. जाणून घेऊयात शंखाची महती आणि त्याच्याशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी. पूजेत शंख असणं आहे आवश्यक पंडित इंद्रमणी घनस्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंखाचा थेट संबंध हा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूशी येतो. यासाठी विष्णूपूजनासमयी शंख पूजन त्याचा नाद करणं हे लाभदायी ठरतं. पुरातन काळी ऋषीमुनी आपल्या उपासनेच्या वेळेस, यज्ञकरतेवेळी शंखनाद करत असत. शंख फुंकल्याने त्यातून जो नाद निर्माण होतो, त्यामुळे देव प्रसन्न होतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. याकरिता पूजेच्यावेळी शंखनाद करणं शुभ असतं. देवघरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो. दक्षिणावर्ती शंख अधिक शुभ मानला जातो. सकाळ-संध्याकाळ शंख वाजवल्याने घरातील अनिष्ट शक्तींचा नाश होतो. तसंच घरातील वातावरण सकारात्मक राहतं. यामुळे कौटुंबिक वातावरणही चांगलं राहतं.
शंखाशी निगडित काही महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रात शंखाशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जो शंख पूजेत वापरला जातो, तो कधीही वाजवू नये. शंख वाजवायचा असल्यास दुसरा शंख वापरावा असं शास्त्र सांगतं. पूजेतील शंख वाजवल्याने त्याचे पावित्र्य नाहीसं होतं. देवघरातील शंख हा लाल कपड्यावर ठेवावा. तसंच पूजेतील शंखात पाणी ठेवून ते पाणी घरात शिंपडावं. शंख वाजवण्यापूर्वी तो गंगेच्या पाण्याने किंवा इतर कुठल्याही शुद्ध पाण्याने शंख साफ करून घ्यावा. पूजा करताना सर्व विधी अतिशय श्रद्धेने पार पाडावेत. हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय हिंदू धर्मशास्त्रानुसार कुठल्या देवाला तुळस कधी वाहावी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कुठल्या देवाची आराधना करावी आदी गोष्टींबद्दल अनेक उल्लेख आढळतात. या मागचा हेतू इतकाच की, रूढी-परंपराचे योग्य पालन व्हावं आणि श्रद्धापूर्वक भक्ती करणार्या भाविकांना इच्छित फलप्राप्ती व्हावी. तसंच रूढी-परंपरा पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक ठराव्यात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)