मुंबई 26 जानेवारी : समर्थ रामदासांनी मनःसामर्थ्यासाठी बलोपसना कशी महत्त्वाची आहे, याविषयी शिकवण दिली. समर्थ रामदास हे भगवान श्रीराम आणि रामभक्त हनुमानाचे निस्सीम भक्त होते. शरीर बलशाली असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा, नकारात्मकतेचा विलक्षण ताकदीने सामना करू शकतो, अशी शिकवण समर्थ रामदासांनी दिली. तरुणांना बलोपासना करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी शक्तीची देवता असलेल्या हनुमानाची मंदिरं गावोगावी उभारली. त्यापैकी महाराष्ट्रातली 11 मारुती मंदिरं विशेष प्रसिद्ध आहेत. ती सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. अनेक भाविक या 11 मारुतींची यात्रा करतात. त्याविषयी जाणून घेऊ या.
सातारा, चाफळ आणि सज्जनगड परिसरात समर्थ रामदासांचं दीर्घ काळ वास्तव्य होतं. इ. स. 1648मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीराम मूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी चाफळला केली.
या मंदिरासमोर दास मारुती, तर मंदिरामागे प्रताप मारुतीची मूर्ती समर्थांनी स्थापन केली. सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावातून चिपळूणकडे जाणारा रस्ता आहे. तिथून उजवीकडे वळून पुढे एक रस्ता चाफळला जातो. तिथे श्रीरामाचं हे सुंदर मंदिर आहे., श्रीरामासमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती आणि मंदिरामागचा प्रताप मारुती यांच्या मूर्ती विलक्षण आहेत. या दोन्ही मूर्तींचं रूप वेगवेगळं आहे.
चाफळपासून तीन किलोमीटर अंतरावर माजगावला समर्थांनी एका पाषाणाला मारुतीचं रूप देऊन मूर्ती घडवली. पाच फूट उंचीची ही मूर्ती पश्चिमेला चाफळच्या श्रीराम मंदिराकडे तोंड करून उभी आहे.
चाफळपासून एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे समर्थांनी मारुतीची छोटीशी, सुबक मूर्ती स्थापन केली. याला चाफळचा तिसरा मारुती, खडीचा मारुती किंवा बाल मारुती असं संबोधलं जातं. या ठिकाणी समर्थांचं रामघळ नावाचं ध्यानस्थळ आहे. तिथे ही चार फुटांची मूर्ती समर्थांनी स्थापन केली.
मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असून, तिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. हा परिसर निसर्गरम्य आहे. तिथे पाण्याचा एक प्रवाह असून, त्याला कुबडीतीर्थ असं म्हणतात.
1650मध्ये समर्थांनी उंब्रजला एक मारुती मंदिर बांधलं आणि एका मठाची स्थापना केली. या मंदिरातल्या मूर्तीची उंची दोन फूट असून, ती अत्यंत देखणी आहे. समर्थांना उंब्रजमधली काही जमीन बक्षीस मिळाली होती. तिथे त्यांनी हे मंदिर उभारलं आहे.
उंब्रजपासून दहा किलोमीटरवरच्या मसूर गावात समर्थांनी 1646मध्ये मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. या मंदिराचा सभामंडप 13 फूट लांबी-रुंदीचा आहे. ही पूर्वाभिमुख मूर्ती पाच फूट उंचीची असून, चुन्यापासून तयार केलेली आहे. मारुतीच्या पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दबलेला दिसतो.
नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळा (जि. सांगली) या गावात 11पैकी एक मारुती आहे. शिराळा एसटी स्टँडजवळ हे मंदिर आहे. तिथली मूर्ती सात फूट उंच आणि चुन्यापासून तयार केलेली आहे. मंदिर आणि मूर्ती उत्तराभिमुख आहे. 1655मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीच्या उजव्या-डाव्या बाजूला झरोके असल्याने सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरणं थेट मूर्तीच्या तोंडावर येतात.
11 मारुतींपैकी सर्वांत प्रथम स्थापन झालेला मारुती शहापूरचा. 1645मध्ये समर्थांनी त्याची स्थापना केली. त्याला चुन्याचा मारुती असंही म्हणतात. सात फूट उंचीची ही मूर्ती पूर्वाभिमुख असून, काहीशी उग्र आहे. कराड-मसूर रस्त्यावर 15 किलोमीटर आणि मसूरपासून तीन किलोमीटर अंतरावर शहापूर फाटा आहे. तिथून एक किलोमीटरवर शहापूरच्या एका टोकाला नदीकाठी हे मंदिर आहे. तिथून जवळच रांजणखिंड आहे. या खिंडीजवळच्या टेकडीवर समर्थांचं वास्तव्य असायचं असं सांगितलं जातं.
सांगलीतल्या बहे गावाजवळच बोरगाव आहे. त्यामुळे याला बहे बोरगाव असं म्हणतात. कराड-कोल्हापूर रस्त्यावर पेठपासून 12 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. रामदासांनी 1652मध्ये तिथे मारुतीची स्थापना केली.
कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे 14 किलोमीटर अंतरावर मनपाडळे गाव आहे. तिथे समर्थांनी 5 फूट उंचीची साधी, सुबकशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख आहे. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते. हे मंदिर अतिशय सुंदर आहे.
कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. तिथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव (जि. कोल्हापूर) आहे. तिथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीचं मंदिर आहे. 11पैकी या मारुतीची स्थापना सर्वांत शेवटी करण्यात आली. इथली मूर्ती दीड फूट उंचीची असून, मनपाडळेपासून पारगाव पाच किलोमीटरवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hanuman, Hanuman mandir, Lifestyle, Temple