मुंबई, 22 ऑगस्ट: भारतात गणेशोत्सवाचा सण उत्साहाने साजरा केला जातो. घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे गणेशाची वर्षभर वाट पाहणारे भाविक या उत्सवकाळात भान हरपून गणेशाची सेवा करतात. बाप्पाला निरोप देण्यासाठीही वाजत-गाजत मिरवणुका काढतात. यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. कोरोनाचे नियम सध्या शिथिल झाले असल्यामुळे गोकुळाष्टमीप्रमाणेच गणेशोत्सवही धूमधडाक्यात साजरा होईल. गणपती ही ज्ञान, बुद्धी, समृद्धीची देवता आहे. वक्रतुंड, गजानन, लंबोदर, विनायक अशा अनेक नावांनी गणेशाला ओळखलं जातं. गणपतीच्या बाललीला व अनेक कथा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. शिव-पार्वती यांचा मुलगा असलेल्या गणपतीच्या जन्माबाबत पुराणात अनेक कथा असल्याचं पंडित इंद्रमणी घनस्याल यांनी सांगितलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणपतीच्या जन्माच्या काही कथा जाणून घेऊ. वराह पुराणानुसार, शंकरांनी गणपतीला पंचतत्त्वांच्या मदतीनं साकारलं होतं. गणपतीचं हे रूप अत्यंत सुंदर व आकर्षक होतं. या रूपाची सर्व देवी-देवतांना भीती वाटू लागली. गणपती सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र तर ठरणार नाही ना, असं सर्वांना वाटू लागलं. तेव्हा शंकरांनी गणपतीचं पोट मोठं करून हत्तीचं तोंड त्याला लावलं. गणेशाच्या जन्मकथांपैकी ही एक कथा आहे. हेही वाचा - Ganesh Chaturthi 2022 : गणपतीला सिंदूर का आवडतो? हे आहेत लाल सिंदूर अर्पण करण्याचे फायदे आणि नियम शिवपुराणातल्या एका कथेनुसार, देवी पार्वतीनं शरीरावरच्या हळदीपासून गणपतीची मूर्ती तयार केली होती. त्यात पार्वतीमातेनं प्राण आणला आणि अशा तऱ्हेनं गणपतीचा जन्म झाला. त्यानंतर पार्वतीनं स्नानगृहाच्या बाहेर गणेशाला पहारा देण्यास सांगितलं. त्या वेळी गणेशानं आईला वचन दिलं, की तो कोणालाही आत जाऊ देणार नाही. तितक्यात तिथं भगवान शंकर आले. त्यांनी अनेक वेळा सांगूनही बालगणेशानं त्यांना आत जाऊ दिलं नाही. त्यामुळे रागाने त्यांनी गणेशाचं मस्तक धडापासून वेगळं केलं. देवी पार्वती बाहेर आल्यावर तिला हे पाहून अतिशय दुःख झालं. आपल्या मुलाला आत्ताच्या आत्ता पुन्हा जिवंत करण्याबाबत तिनं शंकरांना सांगितलं. तेव्हा शंकरांनी गरुडाला उत्तर दिशेला जायला सांगितलं. जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली असेल, तिच्या मुलाचं डोकं आणण्याचा आदेश त्यांनी गरुडाला दिला. तेव्हा गरुडानं हत्तीच्या पिल्लाचं डोकं आणलं. शंकरांनी ते गणेशाच्या धडावर जोडून त्यात प्राण आणला. तेव्हापासून गणेशाचं हे रूप प्रचलित झालं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशाची प्रार्थना करून केली जाते. त्याला विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं. कोणत्याही पूजेआधी आधी गणेशाला वंदन करून त्याची पूजा करतात. गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य केला जातो. दूर्वा, जास्वंदीचं लाल फूल वाहून गजाननाची मनोभावे पूजा केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.