रायचंद शिंदे/ 24 जुलै, भीमाशंकर : आजपासून अधिक श्रावण महिना सुरू झाला आहे. यामुळे बारा ज्योतीर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला पहाटे पासूनच गर्दी झालीय. मुसळधार पाऊस, दाट धुके यातही भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी झाली आहे. यावर्षी 18 जुलै पासून अधिक व श्रावण जोडून आल्याने दररोज भीमाशंकरमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. यावर्षी 18 जुलै ते 16 सष्टेंबर असा अधिक श्रावण आहे. आज पहिला सोमवार साजरा होत आहे. पावसाळा सुरू झाल्या पासून दररोजच भीमाशंकर मध्ये प्रचंड गर्दी आहे. उत्तर भारतातील भविकांची मोठी गर्दी होत आहे. पुणे जिल्हयात सहयाद्रिच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्री क्षेत्र भीमाशंकर वसलेले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळया दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले असून या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकर मधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तिर्थक्षेत्रा बरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणुनही लोकांना आकर्षित करते. येथील जंगलात शेकरू नावाची मोठी खार आढळते. तसेच जंगली प्राणी, पशु पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. पावसाळयात सतत धुक्याने हा परिसर व्यापलेला असतो. हा निसर्ग पहाण्यासाठी पावसाळयात दरवर्षी मोठया प्रमाणात पर्यटक येतात.
यात्रेची तयारी पूर्ण… भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रेसाठी सर्व शासकिय विभागांच्या तयारीचा आढावा दोन बैठका घेवून व प्रत्यक्ष स्थळ पहाणी करून करण्यात आला आहे. यात्रेकरूंना रांगेत जास्त वेळ उभे रहावे लागू नये यासाठी दर्शनरांगेचे योग्य नियोजन केले आहे. तसेच सर्व विभागांचा एक नियत्रंण कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
महादेवाच्या पूजेत अवश्य करा या 7 पानांचा समावेश, भोलेबाबा होतील प्रसन्न
पर्यटकांनी काळजी घ्यावी…. भीमाशंकरकडे येणा-या पर्यटकांनी वर्षा विहार करताना दरी, दाट जंगलामध्ये जाणे टाळावे. तसेच सेल्फी फोटो काढताना आपली दक्षता घ्यावी. पोखरी घाट व मंदोशी घाट या दोन्ही ठिकाणी मोठया संख्येने पर्यटक थांबतात. येथेही पोलिसांची गस्त राहणार असल्याचे खेडचे उपविभागाीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले.
वाहनतळांवर पार्किंगची व्यवस्था.. घोडेगाव व राजगुरूनगर पोलीस स्टेशन बरोबरच जिल्हयातून पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. सोमवार प्रमाणेच शनिवार व रविवारी देखील जादा पोलीस नेमण्यात आले आहेत. भीमाशंकरकडे येणा-या भाविकांनी आपली वाहने ठरवून दिलेल्या वाहनतळावरच लावावीत. इतरत्र रस्त्याच्या कडेला कुठेही लावू नयेत व नशा करून कोणीही येवू नये. त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.