Home /News /pune /

धक्कादायक! ऑक्सिजन संपल्याने 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तडकाफडकी 20 गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले

धक्कादायक! ऑक्सिजन संपल्याने 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तडकाफडकी 20 गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले

चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने (Oxygen Shortage in Chakan Pune) तीन रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर, 20 अत्यवस्थ रुग्णांना मंगळवारी पहाटे तातडीने अन्यत्र हलविण्यात आले.

    शेलपिंपळगाव, 21 एप्रिल: चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने (Oxygen Shortage in Chakan Pune) तीन कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे, 20 अत्यवस्थ रुग्णांना मंगळवारी पहाटे तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. मृतांमध्ये 25 वर्षीय युवक, 45 वर्षीय गृहस्थ आणि 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या (Chakan Rural Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या वीस रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना केल्या. रुग्णालय प्रशासनाने पहाटे साडेतीन-चार वाजल्यानंतर या रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्याच्या सूचना केल्याने नातेवाईक हतबल झाले. यानंतर काही रुग्णवाहिका आल्या. यातील काही रुग्णांना नातेवाईकांनी इतर ठिकाणी हलवले. मात्र, काही रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले नाहीत. यात तीन जणांना प्राण गमवावे लागले. नेमका किती जणांचा मृत्यू झाला, काय परिस्थिती होती, याची पडताळणी सुरू असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. (हे वाचा- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला) दरम्यान, या रुग्णालयात ऑक्‍सिजन संपल्यानंतर सोमवारी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी महाळुंगे येथून ऑक्सिजन सिलेंडरसाठी धावाधाव केली. त्यानंतर काही ऑक्सिजन सिलेंडर मिळाले. मात्र, मंगळवारी (ता. 20) पहाटे ते संपले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना देण्यासाठी ऑक्सिजन नसल्याचे सांगत सर्व अत्यवस्थ रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हलवण्यास सांगितले. अखेरीस यातील तीन रुग्णांनी अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात ऑक्सिजन अभावी प्राण सोडले. यात आणखी काही मृत्यू झाले आहेत का, याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्यांपैकी तीन मृतदेहांवर चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील गॅस दाहिनीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (हे वाचा - उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोना रुग्णांसाठी; सोलापूरच्या डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी) दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. मंगळवारी राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 519 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.55 टक्के एवढा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Corona spread, Coronavirus, Covid-19, Oxygen supply, Pune news

    पुढील बातम्या