पुणे, 31 मे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यामुळे पुण्यातील अनेक भागात कायम ठेवलेले निर्बंध यामुळे पुणेकर सध्या कात्रीत सापडले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकजण घराबाहेर पडण्याचं टाळत आहे. त्यामुळे अर्थचक्रालाही मोठी खिळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देत मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली. या संदर्भातील आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. यासाठीची स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल. ‘मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे. लॉकडाऊनच्या काळात काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नाही. या संकटाच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. नक्की काय म्हणाले महापौर? ‘आतापर्यंत पुणेकरांनी 300 कोटींच्या आसपास कर भरला आहे. गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता 31 मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी 31 मेपर्यंत 650 कोटींचा कर जमा झाला होता. आता या मुदतवाढीने कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल. या निर्णयासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशीही चर्चा झाली आहे,’ असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.