मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

...अन् शिवनेरीवर उंंच आकाशी उधळला भंडारा, शिवराज्यभिषेक सोहळ्यातून महाराजांना मानाचा मुजरा

...अन् शिवनेरीवर उंंच आकाशी उधळला भंडारा, शिवराज्यभिषेक सोहळ्यातून महाराजांना मानाचा मुजरा

जुन्नर, 06 जून : किल्ले शिवनेरीवर आज आकाशात उंच भंडारा उधळत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत शिवप्रेमींनी अनोखा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला आहे. या गडावरचं हे सुंदर दृष्ट मनाला मोहणारं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा किल्ले रायगडावरदेखील साजरा झाला. दरवर्षी या सोहळ्यासाठी लोखो शिवभक्त मोठ्या उत्साहात किल्ले रायगड आणि शिवनेरीवर येतात. मात्र, यंदा कोरोना संसर्गचा प्रादूर्भाव सुरू असल्यामुळे अगदी काही मोजक्याच मावळ्यांसह युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला गेला. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रायगडवरील शिवराज्यभिषेकाचा सोहळा यंदा स्थगित करुन घरीच हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी, तसंच प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं. परंतू प्रतिकात्मक पूजन आणि अभिषेक मर्यादित स्वरुपात साजरा व्हावा या हेतूने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर पाच शिवभक्तांच्या उपस्थितीत हा प्रतिकात्मक सोहळा आज साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करुन, फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण यावेळी करण्यात आली. मंचर इथल्या 'आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची' या गृपचे चार तरुण आणि जुन्नरच्या शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रविंद्र काजळे यांनी हा प्रतिकात्मक शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा केला. यावेळी स्वप्निल घुले, अजित भालेराव, अक्षय भालेराव, संतोष जठार आणि शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रविंद्र काजळे यांनी शिवराज्यभिषेक दिनाच्या औचित्याने शिवकार्याचे स्मरण करत, भंडाऱ्याची उधळण शिवजन्मस्थळी केली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून त्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यात आलं. करोनासारख्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी बळ देण्यासाठीची प्रार्थना शिवजन्मस्थळी करण्याच्या हेतूने हे आयोजन केलं. संपादन - रेणुका धायबर
First published:

पुढील बातम्या