अष्टविनायक महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे मुलीने गमावला जीव, ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त

अष्टविनायक महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे मुलीने गमावला जीव, ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त

ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 15 नोव्हेंबर : बेजबाबदार ठेकेदाराने अष्टविनायक महामार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीने आपला जीव गमावला. जुन्नर तालुक्यातील बेल्हेकर इन्फ्रा स्ट्रक्चरच्या या बेजबाबदार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या मुलीच्या आईने केली आहे.

रस्त्याच्या कडेलाच सुमारे दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवलेल्या व सुमारे 8 फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात नजीकच राहणाऱ्या संतोष रामदास इचके यांच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्ता बंद करत संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या घटनेने काळूबाईनगर परिसरात ऐन दिवाळीच्या काळात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, कॉन्स्टेबल पालवे आणि त्यांचे सहकारी तात्काळ दुचाकीवरूनच घटनास्थळी हजर झाले. एका चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने जमलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. तर संबधित घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सपोनि काबुगडे यांनी नातेवाईक व उपस्थितांना दिले. त्यानंतर जमाव शांत झाला व दुपारी 3च्या दरम्यान या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.

घटनेचे गांभीर्य पाहता काळूबाई मंदिरानजीकच्या रस्त्याच्या कडेला खोलवर खड्डा खोदून ठेवलेल्या बेजबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,मारुती इचके व मृत मुलीचे वडील संतोष इचके व संतप्त नागरिकांतून करण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 15, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या