Home /News /pune /

सीरमची लस कधी उपलब्ध होणार? पूनवाला यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

सीरमची लस कधी उपलब्ध होणार? पूनवाला यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

सीरम संस्थेनं तयार केलेली कोरोनाची लस बाजारपेठेत केव्हा येणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. याबाबत पूनवाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

    मुंबई, 20 नोव्हेंबर : सीरम संस्थेनं तयार केलेली कोरोनाची लस बाजारपेठेत केव्हा येणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. याबाबत पूनवाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘सर्व परवानग्या नियोजनानुसार मिळाल्या तरीही सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (SII) विकसित केलेली लस उपलब्ध व्हायला या वर्षाचा शेवट उजाडणार आहे. सगळं व्यवस्थित पार पडलं तर जानेवारी-फेब्रुवारी 2021 पर्यंत आरोग्य सेवक आणि कोविड योद्ध्यांना लस उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसंच उर्वरित जनतेला पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत लस उपलब्ध होईल,’ अशी माहिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी हिंदूस्थान टाइम्स या वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिली. एचटी लीडरशीप समिट 2020 मध्ये अदर पूनावाला यांना कोरोना लस संशोधन, उपलब्धता, वितरण, किंमत यासंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याची त्यांनी उत्तरं दिली. सीरम इन्स्टिट्युटने एक अब्ज डोस उत्पादनासाठी अस्ट्राझेनेका कंपनीशी करार केला आहे. उपलब्धतेबद्दल अदर म्हणाले, ‘ यूकेतील MHRA (Medicines and Healthcare products Regulatory Agency) आणि EMA (European Medicines Agency) या दोन संस्थांनी लशीच्या इमर्जन्सी वापराला परवानगी दिल्यानंतर सीरम ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) लशीच्या इमर्जन्सी वापराच्या परवानगीसाठी अर्ज करेल.’ लशीची किंमत काय असेल? सीरम इन्स्टिट्युटची ही लस सामान्य नागरिकाला किती रुपयांना पडेल या प्रश्नावर पूनावाला म्हणाले,‘ आमच्या उत्पादनापैकी 50 टक्के लशी आम्ही भारतातील लसीकरणाच्या मोहिमासाठी देणार आहोत. अस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 लशीचे फेब्रुवारी 2021 पर्यंत 100 मिलियन डोस तयार करण्याचं सीरम इन्स्टिट्युटचं ध्येय आहे. लशीच्या एका डोसची किंमत अंदाजे किंमत 500 ते 600 रुपये असेल आणि प्रत्येकाला दोन डोस घ्यावे लागतील त्यामुळे ती 1000 रुपये होईल. भारत सरकारने मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर आम्ही त्यांना खूपच स्वस्त किमतीत म्हणजे 300 ते 400 रुपयांत एक डोस देऊ शकू. त्यामुळे सरकारला कोव्हॅक्सच्याच किमतीला ही लस मिळेल. सध्या बाजारातील किमतींच्या तुलनेत आम्ही खूपच स्वस्तात लस देत आहोत.’ संपूर्ण देशात कधी होईल लसीकरण? संपूर्ण भारतात लसीकरणाला किती वेळ लागेल या प्रश्नावर ते म्हणाले, ‘ प्रत्येक भारतीयाला लस टोचली जाण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. जर प्रत्येकाने लसीकरण करून घ्यायचं ठरवलं तर 2024 पर्यंत देशातील लसीकरण पूर्ण होऊ शकेल. एवढा वेळ लागण्यामागे लशीचा पुरवठा कमी असणं हे कारण नसून सरकारची आर्थिक क्षमता, लसींची उपलब्धता, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि त्यानंतर लस घेण्याची जनसामान्यांची इच्छा इतकी कारणं आहेत. ’ लशीची परिणामकारकता किती आहे ? पूनावाला यांनी लशीच्या परिणामकारतेबाबतही सांगितलं. ते म्हणाले, ‘आपल्याला चिंता होती ती ज्येष्ठांच्या आरोग्याची. आतापर्यंत ऑक्सफर्ड- अस्ट्राझेनेका लशीच्या चाचण्यांमध्ये ती ज्येष्ठांवरही चांगला परिणाम करत असल्याचं दिसून आलंय. दीर्घकालीन रोगप्रतिकारासाठी आणि अँटिबॉडींनी प्रतिसाद देण्यासाठी टी-सेलचा प्रतिसाद महत्त्वाचा असतो आणि तो या लसीने वाढला आहे. पण या लशीने दीर्घकाळ संरक्षण होईल का हे काळच ठरवेल. सध्या तयार होत असलेल्या कुठल्याही लशीच्या परिणामाबाबत कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. आतापर्यंत तरी लशीचे विपरित परिणाम किंवा तक्रारी दिसून आलेल्या नाहीत. भारतातील चाचण्यांचे परिणाम मिळायला अजून दीड महिना लागेल. त्यानंतर आपण लशीच्या परिणामकारकतेचा अंदाज बांधू शकू.’ हे वाचा-'...हे अजिबात सहन करणार नाही', रणवीरची नवीन जाहिरात पाहून भडकले सुशांतचे चाहते लशीच्या मुलांवरील परिणामकारकतेसाठी वाट पहावी लागणार पूनावाला म्हणाले, ‘गोवर, न्यूमोनियाच्या तुलनेत कोरोना लहान मुलांसाठी कमी त्रासदायक आहे. पण मुलं विषाणूची वाहक ठरू शकतात. ज्येष्ठ आणि ज्यांना कोरोना संसर्गाची सर्वाधिक शक्यता आहे त्यांना आम्ही आधी लस देण्याचा विचार करतोय. जेव्हा लस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचा पुरेसा डाटा उपलब्ध होईळ तेव्हाच ती लहान मुलांना देण्यासाठी सुरक्षित असल्याचं आम्ही जाहीर करू. ऑक्सफर्डची लस सुरक्षित असून दोन ते आठ डिग्री सेल्सियस तापमानाला ती साठवता येते जे भारतातील कोल्ड स्टोरेज व्यवस्थेसाठी योग्य असंच तापमान आहे. ’ हे वाचा-तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय?हॅकिंगची शक्यता; या वर्षातील सर्वात कमकुवत 20 पासवर्ड भारताला प्रथम प्राधान्य ‘या क्षणाला भारताला लस देण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देत आहोत. त्यामुळे आम्ही बांग्लादेशाव्यतिरिक्त इतर देशांशी कोणताही करार केलेला नाही. पहिल्यांदा भारत मग दक्षिण आफ्रिकेत आम्ही लशीचे डोस देऊ मग इतर देशांना लस देण्याचा विचार करू. जुलैपर्यंत भारताला 400 मिलियन डोसची गरज भासणार आहे. पण आम्ही आतापर्यंत भारत सरकारशी करार केलेला नाही.’ भारत सरकार अमेरिकी कंपनी फायझरशी लसीबाबत बोलणी करत असल्याची माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याच कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात त्यांच्या मुलाखतीत दिली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या