खासदार संभाजीराजे छत्रपती व उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. पुण्यातील औंध बानेर रोडवर असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मित्राच्या घरी ही भेट झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'आज बऱ्याच वर्षांनंतर आम्ही भेटलो. सातारा आणि कोल्हापूर घराणे मराठा समाजाच्या मुद्यावर एकत्र आलोय. या भेटीमुळे मनापासून आनंद झाला आहे. उदयनराजे यांनी परवाच भेट घेण्यासाठी बोलावले होते, पण तेव्ही भेट होऊ शकले नाही. पण आजही भेट झाली असून आनंद झाला आहे' अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
तसंच, आम्ही सरकारसमोर सहा मागण्या ठेवल्या आहेत, समाज बोलला आहे, आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधी सुद्धा बोलले पाहिजे. आमच्या सहा मागण्या लवकरात लवकर मान्य करा, त्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.