पुणे, 23 ऑगस्ट : चोरी होऊ नये म्हणून दुकानात, ऑफिसमध्ये सीसीटीव्ही लावल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र वारंवार नदीकाठचे विद्युत पंप चोरी होण्याच्या प्रकारामुळे त्रासलेल्या शेकऱ्यांनी थेट नदीपात्रातच सीसीटीव्ही लावला आणि विशेष म्हणजे काही दिवसातच यात चोरी करताना दोन चोर कैद झाले आहेत.
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा, मांडवगण फराटा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी शेताला पाणी देण्यासाठी घोडनदीच्या काठी लावलेले विद्युत पंप, केबल,पाईपची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना नदीकाठी लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत बाळासाहेब नारायण विधाते या शेतकऱ्याने पोलिसात फिर्याद दिली असून गणेश कानिफ कदम (वय 28) रा. शिरसगाव काटा, सूर्यकांत दत्तात्रय माने( वय 23) रा.वडगाव रासाई यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मनोज भैरू कोळपे रा.मांडगण फराटा, बाबू दादा कोळपे रा.शिरसगाव काटा हे या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील शिरसगाव काटा परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून नदीकाठी तसेच विहिरीवर लावलेले, पाण्याचे विद्युत पंप, वायर, पाईप चोरीला जाण्याच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येत घोड नदीकाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवविले होते. 8ऑगस्ट रोजी बाळासाहेब विधाते यांनी शेताला नदीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी बसवलेली 12 एचपीची विद्युत मोटार लाईट गेल्यामुळे बंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विद्युत मोटार चालू झाली नाही म्हणून त्यांनी व त्यांच्या पुतण्याने नदीकाठी जाऊन पाहणी केली असता त्यांना मोटार चोरीला गेल्याचे दिसून आले.
आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता मोटार आढळून आली नाही. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास ते घरी असताना त्यांना गावातील कुलदीप शिंदे यांनी फोन करून सांगितले की नदीवर लावण्यात आलेल्या आपल्या विद्युत मोटरजवळ डीपीला जोडलेले सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन व्यक्ती फिरत असल्याचं दिसत आहे.
त्यावेळी फिर्यादी व त्याचा पुतण्या तसंच गावातील इतर शेतकरी मोटारीजवळ जात असताना दोन इसम हे स्टार सीटी कंपनीच्या मोटरसायकलवरून अंधारातून खड्ड्यातून पळून जात होते. गावकऱ्यांनी तिथं दाखल होत आरोपींना जागीच पकडले. त्यातील एक जणाला फिर्यादी ओळखत असून त्याचे नाव गणेश कानिफ कदम (रा. शिरसगाव काटा) तर दुसऱ्या इसमाने नाव सुर्यकांत दत्तात्रय माने (रा वडगाव रासाई) असे सांगितले. स्थानिकांनी आरोपींना त्यांच्या ताब्यातील एम एच 16 ए डी 4130 या मोटर सायकलसह पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत मांडवगण फराटा येथील पोलीस दूरक्षेत्रास फिर्याद दाखल केली आहे. तसेच गावातील तब्बल सोळा ते सतरा व्यक्तींच्या विद्युत मोटार , पाईप, वायर चोरी गेल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी आरोपी गणेश कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्याने फिर्यादीची मोटार मनोज भैरु कोळपे,बाबु दादा कोळपे यांच्या मदतीने चोरली असून मनोज भैरु कोळपे याला देऊन 2000 रुपये घेतल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार सुभाष रूपनवर, श्रावण गूपचे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, अक्षय काळे हे करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.