पुणे, 20 फेब्रुवारी : पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे हा सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. तळोजा जेलमधील सुटकेनंतर मारणे समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेकांना उत्तर प्रदेश, बिहारची आठवण झाली आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. हे प्रकरण ताजे असतानाच आता गजानन मारणे हा फरारही झाल्याने पुणे पोलिसांची चांगलीच अडचण झाली. या सगळ्यामुळेच पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड गजानन मारणे याचं साम्राज्य उद्धवस्त करणार असल्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी असं आक्रमक रूप धारण केल्यामुळे मारणे याच्या मनात चांगलीच धडकी भरली असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गुंड गजा मारणेचं गुन्हेगारी साम्राज्य समूळ उद्धवस्त करणार, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
हेही वाचा - मुंबई पोलिसांना मोठं यश, कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला!
पोलीस आयुक्तांच्या इशारानंतर प्रत्यक्ष कृतीही दिसणार?
तळोजाहून पुण्यात येताना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम पाळायला सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांना गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल होता. मात्र पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळताच गजा मारणे आणि त्याच्या टोळीचे सदस्य फरार झाले आहेत. तसं प्रसिद्धी पत्रकच पोलिसांनी काढलं आहे.
गजानन मारणे हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झाल्यामुळे आगामी काळात त्याच्यावर कठोर कारवाई करत शहरातील दहशत संपवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. यामध्ये पोलीस यशस्वी होतात की त्यांच्या हाती निराशाच लागते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.