पुणे, 19 सप्टेंबर : पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र खेड घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. राजगुरुनगर पोलीस व महामार्ग पोलीसानी वाहतूक सुरळीत केली. नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात असताना खेड घाटामध्ये माल वाहू ट्रक घाट उतरत होता. यावेळी ब्रेक निकामी झाल्याने वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर चालक ट्रकवर नियंत्रण मिळवत असताना ट्रक घाटातील मार्गावर पलटी झाला. यामुळे घाटाच्या दोन्ही दिशेने दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या अपघातानंतर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत केली. खेड घाटात गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. बाह्यवळण सप्टेंबर अखेर पूर्ण होणार होते. मात्र आद्यप हे काम अपूर्ण असून यामुळे खेड घाटात होणारे अपघात आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बाह्यवळणाचे काम त्वरित पूर्ण करून बाह्यवळण सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.