पुणे, 22 मार्च: पुणे शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत पालिकेनं आजपासून जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरु केलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी आज जम्बो हॉस्पिटलची पाहणी करून तिथल्या रूग्णसेवेचा आढावा घेतला. गेले दोन महिने हे जम्बो कोविड सेंटर बंद होतं. डिसेंबर महिन्यात पुणे शहरात कोरोनावर नियंत्रण आल्यानंतर जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब असली तरी फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आणि दिवसेंदिवस रुग्णसंख्या नवीन रेकॉर्ड करु लागली. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सुरु करण्याचा निर्णय घेतला. हे जम्बो सेंटर चालवण्यासाठीचा सर्व खर्च हा पुणे मनपामार्फत केला जाणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना म्हटलं आहे. जम्बोत किती बेड्स असणार? -आठवड्याभरात 500 बेड्स जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये सुरू करणार- 500 बेडस मध्ये 250 ऑक्सिजन बेड्स, 200 साधे बेडस, 50 आयसीयू बेडस असणार आहेत -जम्बोत आजपासून रूग्ण भरती सेवा सुरू - शुक्रवारपर्यंत 500 बेडस सुरू होणार -तर सध्या शासकीय आणि खाजगी मिळून 2300 बेड्स उपलब्ध. हेही वाचा: पुणेकरांवर कोरोनाचा भीषण परिणाम; 22 टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असली तरी यातील बहुतेक रुग्णांना कोणतेही लक्षण नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत आणि त्यामुळे पहिल्यावेळी 18 ते 20 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आता फक्त दहा टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी म्हटलं. पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थिती पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 35 हजार 394 - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22 हजार 524 - 519 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत - एकूण मृत्यू -5 हजार 53- आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 2 लाख 7 हजार 817 हेही वाचा पुणे जिल्ह्यात कोरोना सुपर स्प्रेडर्सचा शोध सुरू दरम्यान, जरी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्स उपलब्ध असले तरी रुग्णांची वाढती आकडेवारी पालिकेची चिंता वाढवणारी आहे आणि त्यामुळेच जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. तसंच काही खासगी हॉस्पिटलचे बेड्सही पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेनं सुरू केल्याचं पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.