पुण्यातील तरुणाला एक चूक पडली महागात, केवळ 30 मिनिटात झाला मृत्यू

पुण्यातील तरुणाला एक चूक पडली महागात, केवळ 30 मिनिटात झाला मृत्यू

उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणाने अवघ्या अर्ध्या तासात प्राण सोडले.

  • Share this:

पुणे, 24 मे : आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकतं. त्यातही कोरोनासारख्या भयंकर रोगात केलेलं दुर्लक्ष एखाद्याचा जीवही घेऊ शकतं. याचंच उदाहरण पुण्यातून समोर आलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत योग्यवेळी उपचार न घेतल्याने पुण्यातील एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणाने अवघ्या अर्ध्या तासात प्राण सोडले.

पुण्यातील गुलटेकडी या परिसरात राहणाऱ्या एक तरुणाला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. मात्र आपल्याला काही होणार नाही, असा अतिआत्मविश्वास की कोरोनाबद्दलची भीती...नेमकं कारण माहीत नाही. मात्र या तरुणाने होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करत उपचार घेणं टाळलं. मात्र 22 मे रोजी या तरुणाला त्रास असह्य झाला आणि त्याने रुग्णालयात धाव घेतली.

श्वसनाचा त्रास होत असलेल्या संबंधित तरुणाला 22 मे रोजी रात्री साडेसात वाजता रुग्णालयता दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच या तरुणाचा मृत्यू झाला. लक्षणं दिसत असतानाही उपचारासाठी रुग्णालयात न जाण्याच्या चुकीने या तरुणाचं आयुष्य हिरावून घेतलं. 23 मे रोजी आलेल्या अहवालातून सदर तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे.

पुणे विभागात काय आहे कोरोनाची स्थिती...दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी

पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 616 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. कोरोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

संपादन, संकलन - अक्षय शितोळे

First published: May 24, 2020, 10:07 PM IST

ताज्या बातम्या