चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 9 जून : पुण्यामध्ये सीबीआयने मोठी कारवाई करत बड्या आयुक्ताला रंगेहात पकडलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रमोड सीबीआयच्या सापळ्यात अडकले आहेत. जमीन परतावा देण्यासाठी लाच स्वीकारताना सीबीआयने अनिल रमोड यांना अटक केली आहे. महसूल विभागात काम करणाऱ्या उपायुक्त अनिल रामोड 8 लाख रुपयांची लाच स्वीकारत होते, तेव्हाच सीबीआयने सापळा रचून धाड टाकली. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. नॅशनल हायवेच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये लवादाची भूमिका पार पाडणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने ही रेड टाकली. अनिल रामोड सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील भूसंपादनाच्या अपिलवर निकाल द्यायचे, यात ते भुसंपादनाचा मोबदला वाढून देताना 1 कोटीला 10 लाख मागायचे, असा आरोप ऍडव्होकेट याकूब साहेबू तडवी यांनी केला आहे. तडवी यांनची याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती. तडवी यांच्या तक्रारीनंतर सीबीआयने ट्रॅप लावून रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. आता त्यांच्या पुणे आणि नांदेडमधील घरीही बेहिशेबी मालमत्तेची मोजदाद सुरू आहे. सीबीआयनं रामोडच्या पुण्यातील दोन घरी छापेमारी केली. या छाप्यात अंदाजे तब्बल 6 कोटींची रोकड सापडली तसंच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडलेत. त्याची किंमत अद्याप निश्चित केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.