EXCLUSIVE : ...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

EXCLUSIVE : ...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी हा आरोपी कोरोनाची लक्षणं दाखवू लागल्याने सगळेच पोलीस कर्मचारी हादरून गेले.

  • Share this:

पुणे, 29 एप्रिल : पुण्याच्या पूर्व भागातल्या एका पोलीस स्टेशनमधील आरोपीचा कोरोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला आहे. नारकोटिक्स विभागाने अवैध दारू विक्री प्रकरणात या रेकॉर्डवरच्या आरोपीला अटक करून संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं होतं. पण अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी हा आरोपी कोरोनाची लक्षणं दाखवू लागल्याने सगळेच पोलीस कर्मचारी हादरून गेले.

काळजीत पडलेल्या पीआय साहेबांनी लागलीच अँब्युलन्स बोलवून आरोपीला ससूनला धाडून दिलं. एवढंच नाहीतर या आरोपीच्या संपर्कात आलेले सर्व कर्मचारी आणि अधिकारी खबरदारी म्हणून घरी धाडून दिले. म्हणजेच त्यांना घरातच क्वारन्टाइन व्हायला सांगितलं. ही सगळी गडबड डीसीपी साहेबांना कळताच त्यांनी सगळ्यांचीच खरडपट्टी काढत नेमका प्रकार समजून घेतला. तेव्हा आणखीनच भलताच किस्सा समोर आला.

पुण्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अवैध धंद्यांवरील कारवाईचं टार्गेट पू्र्ण करण्यासाठी या रेकॉर्डवरील हातभट्टीवाल्याला अंमली पदार्थ विभागाच्या पोलीस हवालदारानं परस्परच उचललं. एवढंच नाहीतर त्याला चक्क स्वत: बाईकवर डबलशीट बसवून पोलीस स्टेशनच्या लॉकअपला आणून ठेवलं. वरून त्याला नेहमीच्या स्टाईलने पोलिसी खाक्याही दाखवला म्हणे.

पण हा आरोपी मूळातच मद्यपी असल्याने तो अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी तापाने फणफणला. तसंच त्याला खोकलाही सुरू झाला. आरोपीची कोरोना सदृश लक्षणं क्राईम पीआयच्या लक्षात येताच सगळेच हादरून गेले. सगळेच जण त्या नार्कोटिक्सवाल्या पोलीस हवालदाराला दुषणं देऊ लागले. 'तुला हा नसता उद्योग करायला कोणी सांगितला?' म्हणून वरिष्ठांनी त्याची कानउघडणी केली.

खरंतर या सगळ्यात जास्त पोलीस हवालदारच पुरता हादरून गेला होता. कारण तोच तर आरोपीच्या संपर्कात आला होता. डीसीपी साहेबांनी खबरदारी म्हणून आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारन्टाइन करून टाकलं. पण नशीब बलवत्तर म्हणून त्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही वार्ता समजताच अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 29, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या