पुणे : 2 वर्षीय मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

पुणे : 2 वर्षीय मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसंच ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

  • Share this:

पुणे, 15 नोव्हेंबर : शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या अष्टविनायक कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अष्टविनायक महामार्गाच्या बेल्हेकर इन्फ्राच्या ठेकेदारावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304 अ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेजबाबदार ठेकेदाराने अष्टविनायक महामार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकलीचा काल मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसंच ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीने आपला जीव गमावला. जुन्नर तालुक्यातील बेल्हेकर इन्फ्रा स्ट्रक्चरच्या या बेजबाबदार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या मुलीच्या आईने केली होती.

रस्त्याच्या कडेलाच सुमारे दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवलेल्या व सुमारे 8 फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात नजीकच राहणाऱ्या संतोष रामदास इचके यांच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्ता बंद करत संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

घडलेल्या घटनेने काळूबाईनगर परिसरात ऐन दिवाळीच्या काळात शोककळा पसरली. घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, कॉन्स्टेबल पालवे आणि त्यांचे सहकारी तात्काळ दुचाकीवरूनच घटनास्थळी हजर झाले होते. एका चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने जमलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. तर संबधित घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सपोनि काबुगडे यांनी नातेवाईक व उपस्थितांना दिले होते. त्यानंतर आता संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 16, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या