पुणे महापालिकेत जोरदार राडा, मुख्य सभेच्या आयोजनावरून विरोधक आक्रमक

पुणे महापालिकेत जोरदार राडा, मुख्य सभेच्या आयोजनावरून विरोधक आक्रमक

विरोधी पक्षाच्या सभासदांनी महापौर दालनात ठिय्या आंदोलन करत गोंधळ घातला.

  • Share this:

पुणे, 8 फेब्रुवारी : महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यावरून आज पुणे महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला. महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. ती ऑफलाईन म्हणजेच सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात यावी अशी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची मागणी होती. तसे आदेश आज राज्य सरकारकडून आयुक्तांना मिळाले होते. मात्र असं असताना सत्ताधारी भाजपने ही सभा ऑनलाईन घेण्याचं ठरवलं. त्यावरून वाद निर्माण झाला आणि विरोधी पक्षाच्या सभासदांनी महापौर दालनात ठिय्या आंदोलन करत गोंधळ घातला.

महापौर दालनात ठिय्या मांडत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी भाजपला काहीतरी लपवायचे आहे, त्यामुळे ते प्रत्यक्ष सभा घेण्यास तयार नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आजही महापालिकेकडून ऑनलाइन सभा घेण्यासाठी सगळी तयारी करण्यात आलेली होती. गेले आठ महिने कोरोना काळात झालेला खर्च, एकाधिकारशाहीने वागलेले सत्ताधारी आपली काळे कृत्य लोकांसमोर येऊ नयेत म्हणून मुख्य सभा ऑफलाईन घेत नसल्याचा जोरदार आरोप विरोधी पक्षनेते असलेल्या आबा बागुल यांनी केला आहे.

या सगळ्या आरोपांवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. महापालिका राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज काम करत असल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेले आदेश हे उशिरा मिळाल्याने मुख्य सभेचे ऑनलाईन नियोजन पूर्ण झालेलं होतं आणि त्यासाठीच राज्य सरकारच्या आदेशाचा सन्मान ठेवायचा म्हणून मुख्य सभेचे कामकाज ऑनलाईन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'विरोधक जे आरोप इथे करत आहेत तसेच आरोप मुंबईच्या बाबतीत शिवसेनेवरही केला जाऊ शकतो. तिथेही मुख्य सभेला राज्य सरकार परवानगी देत नाही. ती केवळ कोविडच्या काळामध्ये केलेला खर्च किंवा निधीचा दुरुपयोग लोकांसमोर येऊ नये म्हणूनच मुख्य सभेला परवानगी दिली जात नाही का?' असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना विचारला आहे. तसंच विरोधक या विषयाचं राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 8, 2021, 11:18 PM IST

ताज्या बातम्या