पुणे, 14 मे : राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाली आणि पोलीस विभागावर मोठा ताण आला. अशात घराच्या बाहेर न निघण्याच्या वारंवार सुचना देण्यात आल्या असतानाही लोक घराबाहेर पडतात आणि नंतर पोलिसांचा मार खावा लागतो. पण अशात पुणे पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांनी दोन जणांना बेदम मारहाण केल्याचं दिसत आहे. एका दुचाकीस्वाराला आणि दारूच्या नशेत रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हे व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण पोलीस विभागाचा ताण वाढला आहे. अशात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर पोलिसांवर कामाचा भार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांना ही बाब लक्षात घेतली पाहिजे. पण तरीदेखील अशा प्रकारे पोलिसांनी मारहाण करायला नको असं नागरिकांचं म्हणणं आहे.
पुणे पोलिसांनी हिंडणाऱ्या नागरिकाला केली बेदम मारहाण pic.twitter.com/50vVoM9ayA
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) May 14, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, पायी चालणाऱ्या आणि दुचाकीवर हिंडणाऱ्या अशा दोन नागरिकांना साध्या वेशातील पोलिसांनी काठीने अमानुष मारहाण केल्याच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगा पण अशा प्रकारे मारू नका अशा सुचना नागरिकांनी पोलिसांना दिल्या आहेत. याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.