गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, 7 जुलै : राज्यातील सधन महापालिका अशी ख्याती असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी शहरातील नाट्यगृहांच्या भाडेदरात तब्बल चारपटीने वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात नाटकं सादर करणे महाग झालं आहे. या नाट्यगृहांच्या उभारणी पासून आजतागयत कधीच भाड्यात दर वाढ केल्या गेली नव्हती. पण इथल्या प्रशासकीय राजवटीने थोडी थोडकी नाही तर नाट्यगृहांच्या भाडेदरात तब्बल चारपटीने वाढ केली आहे. विशेष म्हणजे नाट्य गृहात सेवा सुविधांचा अभाव असतानाही ही दरवाढ केल्या गेल्याने रंगकर्मी-प्रशासनाविरोधात संघर्ष होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक माहेरघर म्हणविणाऱ्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अडीच हजारात नाट्य प्रयोग आणि इतर कार्यक्रमासाठी दहा हजार रूपये भाडे आकारले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अजब कारभार आणि प्रशासकीय राजवटीत मनमानी पद्धतीने कारभार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सव्वा वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासन जनमानसाचा कौल न घेताच निर्णय घेत आहेत. या शहरातील नाट्यगृहात नाट्यप्रयोगासाठी साडेबारा हजार आणि इतर कार्यक्रमांसाठी 40 हजार रूपये भाडे आकारले जाणार आहे, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ही भाडेवाढ 1 जुलै 2023 पासून लागू केली जाणार आहे. जुने दर आणि नवे दर - चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर अशी पाच नाट्यगृहे महापालिकेने उभारली आहेत. खरंतर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नाट्यगृहे आणि प्रेक्षागृहे उभारली होती. तर प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रमांना भाडे आकरण्याचे धोरण करण्यात आले होते. मात्र, नवीन धोरणात दोनच कॅटेगरी केल्या गेल्या आहेत. नाट्यगृहाचा जमा खर्चाचा मेळ घालण्यासाठी दरवाढ केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यानुसार, 1) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मुख्य सभागृहासाठी तिकीट दर नसलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी आठ हजार, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी 12 हजार रुपये दर आहे. शाळांसाठी तीन तासाकरिता 30 हजार रुपये, महाविद्यालयांसाठी पाच तासांकरिता 48 हजार आणि इतर संस्थांसाठी 60 हजार रुपये दर असणार आहेत. 2) अंकुशराव लांडगे नाट्यगृह, आचार्य अत्रे सभागृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मोफत मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी सात हजार दोनशे रूपये तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी 10 हजार 800, शाळांना तीन तासासाठी 27 हजार, महाविद्यालयांना पाच तासासाठी 43 हजार 200 रुपये, इतर संस्थांसाठी 54 हजार रुपये भाडे असणार आहे. तर सरावासाठी दर कमी असेल. पिंपरीतील गदिमा नाटयगृह तर महाराष्ट्रातील महाग नाट्यगृह ठरणार आहे. गदिमा नाटगृहात नाटकाचे प्रयोग 12 हजार, व्यावसायिक प्रयोग 30 हजार आणि सांस्कृतिक कार्यक्रमास 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी आणि इतर खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. आचार्य अत्रे रंग मंदिर नाट्य प्रयोगासाठी जुने भाडे - 2200 नवीन भाडे - 14120. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जुने भाडे - 8000 नवीन भाडे - 43000 चिंचवडच्या मोरे नाट्यगृहात नाटकासाठी भाडेदर तीन तासांसाठी 4 हजार इतका होता. कोरोनानंतर नाटकांसाठी सवलत दर म्हणून अडीच हजार रुपये इतके भाडे आकारले जात असल्याने व्यावसायिक संस्थांना हे भाडे परवडत होते. आता मात्र सर्वच नाट्यसंस्थांना हे चौपट भाडे द्यावे लागणार आहे. कोरोनाने कलाकारांचं अक्षरशः कंबरड्ड मोडलं होतं. आता कुठे परिस्थिती पूर्व पदावर येत असताना नाट्यगृहांच्या भाडे दरवाढीची निर्णय समोर आल्याने कलाकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आणि अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील या पाच नाट्यगृहात प्रयोग सादर करायचे झाल्यास ऑनलाईन बुकींग तर करावीच लागणार आहे. शिवाय मोठी अनामत रक्कमही भरावी लागणार आहे. या प्रक्रियेत बराच वेळ जाणार आहे त्याचबरोबर केलेली भाडे दरवाढ देखील अवाजवी असल्याच सांगत रंगकर्मींनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.