पिंपरी-चिंचवड, 24 मे : पुण्याचं जुळं शहर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. पण अशात पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या 65 दिवसानंतर शहरातील सलून, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासाठी काही ठराविक वेळ प्रशासनाकडून घालून देण्यात आली आहे. त्यानूसार उद्यापासून नियमांचं पालन करत या दुकानांना परवाणगी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 5 या वेळेत ही दुकानं सुरू ठेवता येणार आहे. यामध्ये प्रत्येक ग्राहकाची नोंद असणं, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं, सॅनिटायझर वापरणं या नियमांचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकीकडे 50 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात 250 हुन अधिक रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात 23 मे रोजी एकूण 269 नवे रूग्ण सापडले त्यात पुणे शहरातील 205 तर पिंपरीत आजवरची सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. शहर भागात ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागातही 13 नवे रूग्ण आढळून आले.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. 23 मे रोजी दिवसभरात 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून घरी सोडण्यात आले आहे. तर शहरात आणखी सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 248 वर पोहोचली आहे.
तर 170 गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 42 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 4606 वर पोहोचली आहे. डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 41 75 आणि ससून 428 इतकी रुग्ण संख्या आहे. तर शहरात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण संख्याही 1892आहे. आजपर्यंतच 2463 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 23 मे रोजी आणखी 1723 जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona