पुणे, 20 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सोमवारच्या निकालानंतर शांत झाला आहे. कुठे भाजप वरचढ ठरले तर कुठे राष्ट्रवादी-शिवसेना, काँग्रेस. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी दणदणीत विजय मिळवला. पण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वाळेण गावची ग्रामपंचायत निवडणूक प्रचंड विशेष ठरली.
या निवडणुकीत 113 वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावत आपल्या नातवाला मतदान केले होते. मात्र त्याचदिवशी आजीबाईने जगाचा निरोप घेतला. आणि यापुढचं मोठे आश्चर्य म्हणजे त्या नातवाचा सोमवारी लागलेल्या निकालात अवघ्या एका मताने विजय झाला.
राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील ग्रामपंचायत निवडणुका बंडखोरी, पक्षांतर, फोडाफोडी प्रचारातील आरोप- प्रत्यारोप ते वारेमाप पैशांचा चुराडा यांनी लक्षणीय ठरल्या. काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभवाचा धक्का पचवावा लागला तर कुठे कुठे तरुणांना गाव कारभारी होण्याचा मान मिळाला. पण मुळशी तालुक्यातील वाळेण गावात ग्रामपंचायत निवडणुकीत जे काही घडलं ते सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
113 वर्षाच्या आजीबाईने नातवाला विजयाचा आशीर्वाद देत अखेरचा श्वास घेतला. अवघ्या एका मताने विजय मिळाल्यानंतर नातवाला आजीची व तिच्या मताची समजलेली किंमत आयुष्यभरासाठी सोबत राहील. मतमोजणी झाल्यावर जो काही निकाल समोर आला त्यात त्यांचा अवघ्या एका मताने निसटता विजय झाला असल्याचे समजले. त्याक्षणी त्यांच्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आपला विजय पाहायला आज आजी हयात नसल्याचे अतीव दुःख होते.
विजय साठे यांच्या विजयात सरुबाईने दिलेलं योगदान हे आशीर्वाद ठरले. मात्र या प्रसंगाने साठे कुटुंबाला आनंद आणि दुःख यांची एकत्र जाणीव करून दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.