प्रियांका माळी,प्रतिनिधी
पुणे, 21 मे : पक्षी हे पिंजऱ्यात किंवा कोणत्याही अभयारण्यापेक्षा खुल्या आकाशात उडताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. पण जिथे झाडे नाहीत आणि निसर्ग नाही तिथे हे पक्षी कसे दिसणार? विशेषत: सिमेंट-काँक्रिटच्या जंगल झालेल्या शहरामध्ये तर पक्षी दिसणं दुर्मीळ होत चाललं आहे. पण, पुण्यातील एका घरात 100 पेक्षा जास्त पक्षी येतात, असं आम्ही सांगितलं तर... आश्चर्य वाटलं ना... होय हे खरं आहे.
पुण्यात राहणाऱ्या स्मिता पासलकर यांचे हे घर आहे. त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत दररोज शंभर पेक्षा जास्त पक्षी येतात. हे पक्षी स्मिताच्या अंगा खांद्यावर खेळतात. त्यात पोपट, सनबर्ड्स, चिमण्या, विणकर अशा अनेक पक्ष्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांचं हे घर अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरलंय.
कशी झाली सुरूवात?
स्मिता यांना लहानपणापासूनच पक्षी आणि झाडांची आवड आहे. 'माझे वडील हे नेहमी पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवत. ते पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मी सध्या ज्या घरात राहते तिथं यापूर्वी पक्षी अजिबात नव्हते. मी बाल्कनीत काही झाडं लावली. त्यानंतर तिथं हळू-हळू पक्षी येऊ लागले. या पक्ष्यांसाठी मी भांड्यामध्ये पाणी आणि धान्य ठेवत असे.
पाणी आणि धान्य नियमित मिळू लागल्यानं इथं पक्ष्यांची संख्या वाढू लागली. मी घराच्या दोन्ही बाल्कनीत पक्ष्यांसाठी सात फिडर बसवले आहेत. या पक्ष्यांना मी सूर्यफुलाच्या बिया, तांदूळ, शेंगदाणे, सफरचंद, डाळिंब मी देते. त्याचबरोबर तांदूळ आणि अन्य फळंही इथं ठेवते,' असं स्मिता यांनी संगितलं.
हाडं गोठवणारी थंडी, श्वास घ्यायलाही अडचण, पण 6 वर्षांची आरिष्का 130 किमी चालली, VIDEO
पक्ष्यांशी जडलं नातं
स्मिता या पहाटे चार वाजता रोज उठतात. घरातील कामं आटोपल्यानंतर त्या पक्ष्यांसोबतच दिवस घालवतात. पक्षी हे त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यांनी या पक्ष्यांची नावंही ठेवली असून त्यांना आता त्यांची भाषाही समजू लागली आहे. त्या पक्ष्यांशी रोज गप्पाही मारतात. पक्षी देखील न घाबरता स्मिता यांच्या अंगाखांद्यावर मनसोक्त खेळतात.
स्मिता यांच्या घरात येणारे पक्षी पाहून इतरांनी आश्चर्य वाटतं. या भागातील लोकांनी यापूर्वी आभाळातच पोपट उडताना पाहिले होते. ते पोपट स्मिता यांच्या घरात येतात. त्यांना रोज सकाळी पक्ष्यांचा मधूर आवाज ऐकू येतो. स्मिता यांचं उदाहरण पाहून त्यांच्या इमारतीमधील अनेकांनी घरोघरी फिडर लावण्यास सुरूवात केली आहे. पक्ष्यांबाबत समाजात जागृती होत आहे, ही आनंदाची गोष्ट असल्याची भावना स्मिता यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.