पुणे, 09 एप्रिल : पुणेकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात काल गेल्या 24 तासांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा मृतांची संख्या 2ने वाढली आहे. पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून रुग्णांची संख्या 204 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात 168, पिंपरी चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आणि कोरोनामुळे वाढत्या मृतांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात सरकारने कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला पण तरीदेखील रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईत अवघ्या 12 तासांत कोरोनाचे 143 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील आकड्यातही मोठी वाढ
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ताज्या माहितीनुसार, पुणे, औरंगाबाद येथे प्रत्येकी 3, कल्याण डोंबिवलीध्येही 4 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या भागात प्रत्येकी एक असे एकूण 162 रुग्ण 12 तासांत वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण 1297 झाला आहे.
पुढचे 7 दिवस महत्त्वाचे
पुढचे 7 दिवस संसर्ग वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या दिवसात काळजी घेतली तर कोरोनाचा फैलाव आवाक्याबाहेर होणार नाही, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईबरोबरच पुण्यातही मास्क लावून जाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्याच्या मध्यवर्ती पेठांचा भाग सील करण्यात आला आहे. दुपारी पोलिसांनी संचलनही केलं. पुणेकरांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.