पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं, PMPबसवर झाड कोसळून चालक जखमी

पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं, PMPबसवर झाड कोसळून चालक जखमी

या पावसामुळे नागरिकांमध्येही भीती निर्माण झालीय. अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

  • Share this:

पुणे 09 ऑक्टोंबर :  पुण्याला बुधवारी पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढलं. संध्याकाळी सहा नंतर आभाळ भरून आलं आणि सोसाट्याटा वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचलं आणि वाहतूक खोळंबली. टिळक रोडवर PMPच्या एका बसवर वडाचं झाड कोसळलं. एसपी कॉलेजच्या जवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात बसचा चालक गंभीर जखमी झालाय. PMPही बस दुरुस्ती विभागाची होती त्यामुळे त्यात मोजकेज लोक होते. वडाचं अजस्त्र झाड पडल्याने बसचा चेंदामेंदा झाला. त्यात काही जण अडकले होते. त्यांना बचाव पथकाने बाहेर काढलं. मात्र बसचालकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. संध्याकाळची वेळ असल्याने सगळेच घराकडे निघाले होते. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने मुसळधार पाऊस येतोय. दिवसभर शांत असलेला पाऊस संध्याकाळच्या सुमारास असा कोसळतो की सर्व व्यवस्था कोलमडून पडते. या पावसामुळे नागरिकांमध्येही भीती निर्माण झालीय. अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

 

पुण्यात पावसाने थैमान घातल्याने अनेक रस्ते जलमय झाले. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले. पुण्यात अनेक भागात वीज गायब झाली आणि  प्रचंड वाहतूक कोंडीही झाली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (9 ऑक्टोंबर) पुण्यात पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. राज यांची ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातली पहिलीच सभा असल्याने ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र  संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा होण्याआधीच वाहून गेली.

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. जे कार्यकर्ते जमले होते त्यांनी मैदानातल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन बचाव करावा लागला सभा घेणं शक्यच नसल्याने अखेर वेळेवर सभा रद्द करावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या