पुणे, 20 ऑक्टोबर : 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. प्रकाश जी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाही. पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची पायमल्ली करणारे आहे,' असं म्हणत माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
'वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. या महामानवाचे प्रकाश हे नातू आहेत. त्यांच्याकडून आलेले हे वक्तव्य लज्जास्पद आहे. त्यांनी घटनात्मक पदावरील पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने राज्यघटनेची झालेली पायमल्ली ही थेट डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचीच पायमल्ली आहे,' असा घणाघातही संजय काकडे यांनी केला आहे.
...म्हणून प्रकाश आंबेडकर हार पत्करत गेले, संजय काकडेंचा हल्लाबोल
"प्रकाश आंबेडकर हे सवंग प्रसिद्धी मिळणारी वक्तव्य करून राजकारण करीत आले. त्यांना अशी वक्तव्य करून स्टार व्हायचे आहे. परंतु, ते बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम न राहिल्यानेच जनतेने त्यांना नाकारले आहे. आतापर्यंत ते चारवेळा लोकसभेची निवडणूक हारले. तसेच विधानसभेतील निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिका, नगरपालिकांतही त्यांना विजय मिळवता आला नाही.
प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांच्या घराण्यातील असल्यानेच त्यांना मान मिळाला. मायावती बाबासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन गेल्या तर, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. परंतु, प्रकाश आंबेडकर सतत हार पत्करत गेले. राजकारणात जेव्हा प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर येतील तेव्हाच जनता त्यांना स्वीकारतील.
रामदास आठवले बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे ते खासदार झाले, मंत्री झाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घटनात्मक पदांचा व राज्यघटनेचा सन्मान करावा तेव्हाच त्यांचाही लोक सन्मान करतील ही अपेक्षा आहे," असं म्हणत संजय काकडे यांनी प्रकाश आबंडेकर यांना टोला लगावला.
नक्की काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत टीका केली आहे. 'मोदी हा देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे. तो देश विकायला निघाला आहे. प्रमाणे एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत,' असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.