पुणे, 29 फेब्रुवारी : फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेवेळी वाद झाला आहे. या स्पर्धेच्या समारोपाला आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात पोहोचले. शरद पोंक्षे हे ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. तसंच त्यांच्या आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या घोषणाबाजीला अभाविपकडूनही घोषणाबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आलं. कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या शरद पोक्षेंचा जाहीर निषेध, असे पोस्टर यावेळी विद्यार्थ्यांनी झळकावले. त्यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आणि पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरु करण्यात आला. पोलिसांच्या अंगावर थुंकला कैदी, लाथ मारून अंगाचा चावाही घेतला; भयानक प्रकाराचा VIDEO VIRAL महाविद्यालय परिसरात पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे कार्यक्रम होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. पण शरद पोंक्षे यांनी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली आणि अखेर कार्यक्रम सुरू झाला. कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ‘मी सावरकर या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून या ठिकाणी यापूर्वी अनेक वक्ते आले आहेत. यंदाच्या वर्षी अभिनेते शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले असून ते त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत. मात्र या कार्यक्रमापूर्वी काही संघटनांकडून सावरकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे आम्ही खपवून घेणार नाही,’ असं म्हणत कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू हेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.