वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 11 जुलै : डीआरडीओचे डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट झाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅटिंग समोर आले आहे. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अग्नी 6, मिसार्इल लाँचर, एमबीडीए, ब्रह्मोस आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल (एसएएम), इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि डीआरडीओच्या कामांची माहिती डॉ. कुरुलकर याने झारा हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरवल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे. तर त्याने झारा हिला सरफेस टू एअर मिसाइल, ब्रह्मोस, अग्नी 6, मिसार्इल लाँचर, एमबीडीए आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, इंडियन निकुंज पराशर याबाबत चॅटिंग केली आहे. त्यातील काही फोटो आणि माहिती डिलीट करण्यात आली आहे. जून 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान वेळोवेळी केलेले चॅटिंग एटीएसने न्यायालयात दोषारोपपत्राच्या माध्यमातून सादर केले आहे. झाराने विचारले, ब्रह्मोस हे तुझे इनव्हेशन आहे का? असे विचारल्यावर डॉ. कुरुलकर म्हणाला, ‘माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक डिझाईन्स आहेत.’ त्यावर ती म्हणाली ‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई 30 वर लागेल ना? आपण आधीपण यावर चर्चा केलीय.’ त्याला डॉ. कुरुलकर याने हो, असे उत्तर दिले असून, पुढे त्याने ‘आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत,’ अशी माहिती दिली. माझा नंबर ब्लॉक का केला? झाराचा सवाल : डॉ. कुरुलकरला झारा हिने ती युकेमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची ओळख सांगितली होती. त्यानंतर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये डॉ. कुरुलकर याने झाराचा मोबाईल ब्लॉक केला होता. तिने अनोळखी क्रमांकावरून माझा मोबाईल ब्लॉक का केला, असा प्रश्न डॉ. कुरुलकर याला विचारला, असे आरोपपत्रात नमूद आहे. डॉ. कुरुलकरने चॅटिंगद्वारे झाराला काय माहिती दिली : - एसएएमची टेस्ट झाली आणि ती हवार्इ व सैन्य दलाला देणार - ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले - ड्रोनच्या टेस्टींगचे व्हीडीओ पाठवले - कोणत्या देशांनी एके सिस्टम मागवली - फिलीपीनने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केली - अग्नी 6 मी डिझार्इन केले आहे अग्नी 6 बाबत झालेले चॅटिंग : झारा : अग्नी 6 चे काम कसे सुरू आहे, त्याची टेस्ट कधी होणार? डॉ. कुरुलकर : नार्इट फायर करणार, थोडा धीर धर झारा : अग्नी 6 कुठे जाणार सैन्य की हवार्इदल? डॉ. कुरुलकर : दोन्हीकडे झारा दासगुप्ता आणि डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यातील चॅटिंग : झारा : ब्रह्मोससाठी किती व्हर्जन मॉडिफाईड केली गेली? डॉ. कुरुलकर : मला वाटते खूप आहे. बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील. झारा : बेब, डिझाईन रिपोर्ट म्हणजे तुझ्या मते कसा असेल? डॉ. कुरुलकर : बेब, याची तुला कॉपी व्हॉटस्अप किंवा मेल करू शकत नाही. हे खूप संवेदनशील आहे. मी ती मिळवितो आणि तयार ठेवतो. तू इथे आल्यावर ती दाखवतो’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.