पुणे, 01 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्टाफ यांच्या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. पुणे इथल्या भारती हॉस्पीटलमध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. ती व्हेंटीलेटरवर होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून व्हेंटीलेटरवरुन काढून आयसीयूमध्ये तिला शिफ्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत, ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी कोरोना बाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी आणि त्यांच्या चमूचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे. पुण्यातील ही 41 वर्षीय महिला जी परदेशात गेली नव्हती आणि परदेशी गेलेल्या नागरिकाच्या संपर्कात आल्याचं ही आढळले नव्हतं. पण तरीही तिला करोनाची लागण झाली होती. पण आता चांगल्या आणि योग्य उपचारानंतर तिच्या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. या महिलेचे 5 नातेवाईक ज्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची परवा न करता इतरांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानायला हवेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








