पिंपरी चिंचवड, 23 जून : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड इथल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत. कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयांना भेट देत तिथल्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. पण यावेळी फडणवीस हे नेत्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा घेत रुग्णलयात दाखल झाले. त्यामुळे बराच वेळ रुग्णलयासमोर गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
देवेंद्र फडणवीस हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातही कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज ते पिंपरीतील कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाला आहे. अशाने कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे शेतकऱ्यांना कर्जवाटप व्हावं याकरता सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे ही घोषणा करण्यात आली होती. ‘कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या’ असं या आंदोलनाचं नाव आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात, गर्दीने सोशल डिस्टिंगसीनचा फज्जा pic.twitter.com/9l1W8il6FA
— News18Lokmat (@News18lokmat) June 23, 2020
पावसाळा सुरू झालेला असला तरी अजूनही खरीप हंगामासाठीचं शेतकऱ्यांचं पीककर्ज वाटप सुरू न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं. तसंच राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे ही योजना अपयशी झाली असल्याची टीका भाजपनं केली आहे.