
'आम्हाला होणार पहिलं मूल आम्ही देशासाठी अर्पण करू', हे वचन लग्नमाळ गळ्यात पडताच बोहल्यावरूनच या जोडप्याने एकमेकांना दिलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात राहणारा उच्च शिक्षित तरुण संकेश सुंबे प्रियेसी आरती चोधरीसोबत विवाह बंधनात अडकला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघांनी मागच्या आठवड्यात झालेल्या valentine day ला विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच संध्याकाळी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताने 42 जवान गमावले.

वारंवार होणाऱ्या अश्या हल्ल्यांमुळे आपल्या मुलांना लष्करात भरती करायचं की नाही? या प्रश्नानं देशातील अनेक पालकांची चिंता वाढवली. त्याला अपवाद ठरत या जोडप्यानं हा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे मंडपात हे सांगताच वऱ्हाडी मंडळी आणि नातेवाईकांनी "भारत माता की जय" असा जय घोष करत या नव दांपत्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

लग्न सोहळ्याच्या ठिकाणी घडलेला हा प्रकार अनेकांना अचंबित करणारा होता. मात्र संकेश आणि त्याच्या पत्नीने घेतलेला निर्णय स्तुत्य आणि देशाभिमान बाळगणारा म्हणावा लागेल.




