पुणे, 21 मे : कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पुणे शहरात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले होते. नंतरच्या काळात पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश आलं. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतरही ही संख्या आटोक्यात आणण्यात अद्याप यश आलं नाही. त्यामुळे अर्थकारणाला गती देण्यासाठी प्रशासनाने आता फक्त कंटेन्मेंट झोनमधीलच निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील खुल्या केलेल्या 97 टक्के रस्त्यावरचा बंदोबस्त हलवला आहे.
पुण्यातील रस्त्यावरच्या वाहतुकीवर आता पोलीस नियंत्रण ठेवणार नाहीत. पोलीस गुन्हे अन्वेशनाच्या कामात वर्ग करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांच्या काठीच्या भितीने बाहेर पडायला बिचकणारे पुणेकर व्यवहार्य गरजांसाठी पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडतील अशी आशा करायला हरकत नाही.
दरम्यान, व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात दुकानांना परवानगी दिली आहे. पुण्यात अनेक भागात दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र भीतीपोटी नागरीक अजुनही बाहेर पडायला धजावत नाही, असेच दिसून येत आहे. ज्या व्यवसाय आणि दुकानांना परवानगी दिलीय त्याची वेळ सकाळी 9 ते 5 राहणार असून रात्री 7 ते सकाळी 7 या वेळात संचारबंदी लागूच असणार आहे. मात्र असं असलं तरी बाजारपेठेत गर्दी नाही.
एखादं दुसरं दुकान उघडलं आहे ते ही साफसफाई करता. लोकांमध्ये कोरोना विषयी भीती आहे शिवाय लॉकडाऊन चे निर्बंध यामुळं ग्राहक, नागरिक घरीच राहणं पसंद करतायत. दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. लोक, नागरिक बाहेर पडणार का हा कळीचा मुद्दा आहे. आणखी काही दिवसांनी पूर्ण चित्र स्पष्ट होईल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीनंतर पुणे महापालिकेने लॉक डाऊन 4 च्या टप्प्यात काय काय सुविधा, दुकाने सुरू करणार काय काय बंद राहणार याची माहिती जारी केली. नव्या नियमावलीनुसार आता रेड आणि नॉन रेड झोन अशी विभागणी करण्यात आलीय आणि कंटेन्मेंट झोनचीही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट झोन आणि कंटेन्मेंट झोन अशी विभागणी झाली आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात अतिसंक्रमणशील भागात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सेवा,सुविधा बंदच राहणार आहेत.
संपादन- अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune news