पुरंदर, 16 जुलै: राज्यातील कोरोनाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन यंदा होणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ मंडळानं कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पालखीही निघणार नसल्यानं भाविकांनाही जेजुरीला न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं जेजुरी शहरासह परिसर कन्टेनमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून 14 दिवस जेजुरी शहर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे 20 जुलैला होणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ -मानकरी मंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra Board HSC Result 2020 : बारावीचा निकाल इथे पाहू शकता.
सोमवती अमावास्येच्या दिवशी परंपरेनुसार सेवेकरी,पुजारी, मानकरी यांच्या हस्ते खंडेरायाची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. या संपूर्ण विधीवत सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जेजुरीत सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाविकांनीही जेजुरीत येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. सोमवती यात्रेनिमित्त कोणीही भाविकांनी शहरात येऊ नये ,अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी बैठकीत सांगितले.