पुणे, 26 एप्रिल : महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ पुणे शहराला कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. मागील एक आठवड्यापासून पुणे शहरात दररोज सरासरी 100 रुग्ण आढळून आले आहेत. वैद्यकीय उपाययोजनांबाबत अधिक काळजी घेऊनही रुग्णसंख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं खरोखरच पालन होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात या आठवड्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या सोमवार (20 एप्रिल)- 80 मंगळवार (21 एप्रिल)- 42 बुधवार (22 एप्रिल)- 66 गुरुवार (23 एप्रिल)- 104 शुक्रवार (24 एप्रिल)- 104 शनिवार (25 एप्रिल)- 90
दरम्यान, पुण्यामधील रुग्णांमध्ये मुंबईच्या तुलनेत कमी वाढ होत असली तरीही लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुण्यात सध्या होणारी वाढही चिंतेचा विषय आहे. कारण पुण्याच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता कितीतरी अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागतील, असं सध्याचं चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचा कसा उडतोय फज्जा? पुण्यातल्या शिंदे आळी परिसरात रोज रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान भाजी विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. कसबा परिसर सील करण्यात आला आहे. दिवसा भाजी खरेदीला गर्दी होते म्हणून आता रात्री भाजी विक्री केली जात आहे. अशा पध्दतीने पुण्यात रात्री भाजी बाजार भरला जात आहे, त्यालाही गर्दी होत आहे. पोलिसांनी रात्री गस्त जर घातली ही परिस्थिती दिसणार नाही. जर रात्री अशी गर्दी केली तर कोरोना आटोक्यात येणं शक्य नाही, असं बोललं जात आहे. कसबा पेठेत 100 च्या वर रुग्ण आढळले आहेत. संपादन - अक्षय शितोळे