चिंचवड, 3 फेब्रुवारी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर भाजपमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही, त्यातच जगताप कुटुंबामध्ये वादाचा अंक समोर आला आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारीवर दावा केला, त्यानंतर त्याच भाजपच्या अधिकृत उमेदवार असतील अशी चर्चा रंगली. त्याचवेळी दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीत शंकर जगताप यांचं नाव आलेलं नाही.
जगताप कुटंबातून एकाच उमेदवाराचं नाव निवडणुकीसाठी समोर येईल, अशी अपेक्षा होती, मात्र दोघांनी उमेदवारीवर दावा ठोकल्याने जगताप कुटुंबातल्या वादाचा पहिला अंक जाहीरपणे समोर आल्याची चर्चा आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीची उमेदवारी निश्चित झालेली नसताना चिंचवडमध्ये मात्र लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर रंगलं आहे. या पोस्टर वॉरमध्ये दोन्हीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या जागेवरून जगताप कुटुंबातल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीदेखील ही पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत आहे, पण चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. चिंचवडप्रमाणेच पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातही भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP