चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 27 मार्च : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला. महाविकासआघाडीकडून रिंगणात उतरलेले रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासणे यांना धक्का दिला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत होती, पण भाजपने टिळक कुटुंबातल्या कुणालाही उमेदवारी दिली नाही. टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारणं भाजपच्या पराभवाचं कारण ठरल्याच्या चर्चाही झाल्या. तसंच उमेदवारी न मिळाल्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याचंही बोललं गेलं.
कसबा पेठ पोटनिवडणुकीतल्या या पराभवानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. टिळक कुटुंबातल्या कुणाला उमेदवारी का दिली नाही, याचं कारण चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता, त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. न्यूज18 लोकमतच्या एक्सक्ल्यूझिव्ह मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली आहे.
'ज्या घरातला माणूस जातो, त्या घरातल्या कुणालातरी तिकीट द्यावं लागतं. पण आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्जिस्टन्स कमी झाला,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil