Home /News /pune /

Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

पुणे, 13 मे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आत्त्या संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचे पुण्यात निधन झालं आहे. संजीवनी करंदीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असून पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या सख्ख्या बहीण होत्या. त्या 84 वर्षांच्या होत्या. संजीवनी करंदीकर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्या पुण्यात वास्तव्यास होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!" संजीवनी करंदीकर यांच्या निधानामुळे ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच शिवसैनिकांमध्येही शोककळा पसरली असून सर्वजण संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली वाहत आहेत. संजीवनी करंदीकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे हे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या एकूण अपत्यांपैकी संजीवनी करंदीकर या एकच्याच हयात होत्या. आज त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान बहीण होत्या. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर प्रसारमाध्यमांनी संजीवनी करंदीकर यांची मुलाखत घेतली होती आणि त्यावेली त्यांनी उद्धव ठाकरेंच्याबाबत अनेक किस्से सांगितले होते. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दोन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुबईत त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव मुंबईत आणण्यात आले. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मी ताई ठाकरे जी, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे जी यांनी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिली.
Published by:Sunil Desale
First published:

पुढील बातम्या