शहरांमध्ये घाण आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले किंवा गटारं तयार केली जातात; पण अनेक वेळा समाजातली दुष्कृत्यं आणि माणसाची घाणरेडी विचारसरणीही या नाल्यांमधून प्रवाहित होत असल्याचं दिसून येते. काही वेळा असे प्रसंग घडतात, ज्यात नाल्यांमध्ये जिवंत प्राणी सापडतात आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. अशाच 10 विचित्र गोष्टींची माहिती घेऊ या.
मूल - लॉलवॉट वेबसाइटच्या माहितीनुसार, नवजात बालकांना नाल्यात टाकून निघून जाणारे अनेक जण आहेत. निष्पाप आणि निरागस जिवाशी अशा प्रकारे खेळणं भयंकर असलं तरी हे सत्य आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 2013मध्ये चीनच्या जिजांग प्रांतात एका बाळाला गटारातून बाहेर काढण्यात आलं होतं.
मगर - लॉलवॉट वेबसाइटच्या माहितीनुसार, 2006मध्ये एका नाल्यात 600 पौंड वजनाची मगर सापडली होती. ही घटना कोणत्या देशात घडली याबाबतची माहिती स्पष्ट नाही. गुगलवर सर्च केलं असता, अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहर आणि ब्रुकलिनमध्ये अशा घटनांच्या बातम्या मिळाल्या; पण यासंबंधीच्या बातम्या फार जुन्या नाहीत.
फॅक्स मशीन - नाल्यांमध्ये अनेकदा यंत्रंही सापडली आहेत.स्कॉटलंडमध्ये एकदा नालेसफाई सुरू असताना त्यात एक सायकल आणि त्यासोबत एक फॅक्स मशीन सापडलं होतं; मात्र या वस्तू नाल्यात कशा पडल्या याविषयी कोणाकडे काही माहिती नव्हती.
पिल्लू - मानवी बालकांप्रमाणेच अनेकदा माणसं जनावरांच्या पिल्लांनाही नाल्यात सोडून देतात. ब्रिटनमधल्या व्हिक्टोरियातल्या एका नाल्यात कुत्र्याचं एक पिल्लू सापडलं होतं. अशाच प्रकारची घटना अमेरिकेतही घडली होती. तिथं नाल्यात पडलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांना जीवदान देण्यात आलं होतं.
गोल्ड फिश - नदी, तलाव, समुद्र किंवा मत्स्यालयात मासे आढळतात; पण तुम्ही कधी शहरातल्या गटारात मासे पाहिले आहेत का? कॅनडातल्या एका गटारात गोल्ड फिश सापडल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. सहसा मृत मासे फेकून दिले जातात; पण तिथं चक्क जिवंत गोल्ड फिश फेकून दिले गेले होते. कर्मचाऱ्यांनी सुमारे 40 गोल्ड फिश या गटारातून बाहेर काढले होते.
डायनासोरचे अवशेष - ही नाल्यात सापडलेली सर्वांत धोकादायक गोष्ट आहे. 2010मध्ये कॅनडातल्या क्वेसनल हाइट्सच्या नाल्यात डायनासोरचा दात सापडला होता. हा दात अल्बर्टोसॉरस डायनासोरचा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला होता.
सोनं - नाल्यातून सोनंदेखील सापडलं आहे. जपानमधल्या नागानोमधल्या नाल्यात सुमारे 44 लाख रुपये किमतीचं सोनं सापडलं होतं; मात्र हे सोनं गटारातून वाहणारं घाण पाणी स्वच्छ करताना जलशुद्धीकरण केंद्रात कणांच्या रूपात सापडलं होतं.
मोटारसायकल - ब्रिटनच्या ट्रेंट या छोट्या शहरातल्या नाल्यात कर्मचाऱ्यांना एक मोटारसायकल सापडली होती. ही मोटारसायकल जवळपास पूर्ण खराब झालेली होती.
मॅन्डिबल - मॅन्डिबल हे कवटीचे सर्वांत मोठं हाड असतं. मँडिबल म्हणजे खालचा जबडा. एकदा नाल्यातून एका विचित्र प्राण्याचं मँडिबल हाड सापडलं होतं. परंतु ही घटना कोणत्या देशात घडली याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
गाय - चीनमधल्या फुजियान प्रांतात एका गायीला नाल्यातून बाहेर काढण्यात आलं. ती नाल्यात कशी गेली याबाबत माहिती नाही; पण ती चार दिवस होती. तिचा आवाज ऐकताच तिला वाचवण्यासाठी तिथे अनेकांनी धाव घेतली आणि गायीला बाहेर काढण्यात आलं.