गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. एखादी समस्या असेल तर त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करून त्यावरचा तोडगा काढला जातो. अशाच एका समस्येवर मात करण्यासाठी कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने प्रयत्न केले. ते प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.
2019मध्ये कर्नाटकातील एका माणसाने झाडावरून फळं तोडण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढला होता. त्याने सुपारीच्या झाडावर पटकन चढण्यासाठी वापरता येणारं एक उपकरण तयार केलं होतं. त्याच्या या उपकरणाने बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधलं होतं.
‘ट्री बाइक’ची ट्रायल यशस्वी झाल्यानंतर त्याला याचं डिझाइन आणि डिव्हाइस विकता आलं असतं; पण त्याने असं केलं नाही, तो विचार करत राहिला आणि या मशीनमध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन मार्ग वापरत राहिला. कोमाले गणपती भट असं या अवलियाचं नाव आहे.
“लोक मला वारंवार विचारत होते की मी असं काही यंत्र बनवू शकतो का, जे सुपारीसह इतर झाडांवरही चढण्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून मी बर्याच चाचण्या केल्या, काही तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि हे नवीन मशीन बनवलं,” असं कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या बंटवालचे कोमाले गणपती भट म्हणाले.
वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी ‘ट्री बाइक’ बनवून शेतकर्यांचं काम सोपं केलं आहे. आपल्या आधीच्या ट्री बाइकमध्ये सुधारणा करून त्यांनी सुधारित ट्री बाइक विकसित केली. ही बाइक 45 किलो वजनाची आहे; पण ती ट्रॉलीच्या साहाय्याने सहज वाहून नेता येते.
पेट्रोलवर चालते आणि 1 लिटर पेट्रोलमध्ये किमान 70 ते 80 झाडांवर चढता येते. 5 ते 15 इंच जाडी असलेल्या झाडांवर ही बाइक वापरली जाऊ शकते. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे ती झाडांवर 360 डिग्री अंशांत फिरते. ती खासकरून सुपारी आणि नारळाच्या झाडांवर वापरता येते. शिवाय आंबा आणि फणसाची झाडं सरळसोट असली, तर त्यांवर चढण्यासाठीही ती वापरता येते.
कोमाले यांनी बनवलेली ही बाइक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. त्याचं कारण म्हणजे या कामासाठी मजूर मिळणं हे एकप्रकारचं आव्हान असतं. या मशीनच्या मदतीने शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासणार नाही.
ट्री बाइकला कर्नाटक राज्य सरकारकडून 43,000 रुपये अनुदान मिळतं. त्यामुळे त्यासाठी 1 लाख 12 हजार रुपयांत ही बाइक मिळू शकते. ट्री बाइक ऑपरेट करणं खूप सोपं आहे. महिला आणि लहान मुलंही या बाइकच्या मदतीने झाडावरून फळं काढू शकतात, असं भट यांनी सांगितलं.