सर्वोत्कृष्ट कार विमा आणि सर्वोत्कृष्ट विमा कंपनी जाणून घेण्यापूर्वी, वाहन मालकाने त्याच्या गरजा तपासल्या पाहिजेत आणि कोणत्या प्रकारची पॉलिसी हवी आहे, हे स्वत: जाणून घेतलं पाहिजे. भारतात दोन प्रकारच्या कार विमा पॉलिसी आहेत, ज्यात तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी) आणि सर्वसमावेशक विमा (कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन) यांचा समावेश आहे. तुमच्या वाहनासाठी चांगलं कव्हरेज देणारा विमा निवडावा. IDV म्हणजे तुमच्या वाहनाचे सध्याचे बाजार मूल्य आहे.
IDV धोरण IDV ही पॉलिसी खरेदी करताना निश्चित केलेली कमाल विमा रक्कम असते. वाहनाचे संपूर्ण नुकसान किंवा चोरी झाल्यास मालकाला ती किंमत दिली जाते. तुमचे वाहन जसजसे जुने होईल तसतसे तुमचे IDV विमा घोषित मूल्य कमी होईल. तसाच वर्षानुवर्षे प्रीमियम कमी होऊ शकतो.
कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा प्लॅन - थर्ड पार्टी इन्शुरन्ससह त्याच पॅकेजमध्ये स्वतःचे नुकसान पॉलिसी देखील समाविष्ट केली जाते, तेव्हा त्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन पॉलिसी म्हणतात. अशा पॉलिसीमुळे, इतर व्यक्ती आणि वाहनाच्या नुकसानीबरोबरच, तुमच्या वाहनाचे झालेले नुकसानीचे त्याच पॉलिसीमध्ये भरपाई मिळते.
तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) विमा - थर्ड पार्टी इन्शुरन्स असा असतो, ज्यामध्ये तुमच्यामुळे झालेल्या कोणत्याही अपघाताचा दावा तुम्हाला मिळत नाही, तर समोरच्या व्यक्तीला मिळतो. समजा तुमची बाईक किंवा कार दुसर्या बाईक किंवा कारला धडकली, तर तुमची विमा कंपनी अपघातामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई समोरच्या व्यक्तीला देते. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये तुमची बाईक किंवा कार चोरीला गेली तरी तुम्हाला त्याचा दावा मिळत नाही. कारण यामध्ये चोरीचे संरक्षण नसते आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत फक्त समोरच्या पक्षालाच फायदा मिळतो, ज्यांचा तुमच्या वाहनामुळे अपघात झाला आहे. हा विमा म्हणजे वाहनाची कागदपत्रे पूर्ण ठेवण्यासाठी किंवा आरटीओ नियमांसाठी असतो इतकंच.
थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये सर्वोत्तम कोणता? थर्ड पार्टी इन्शुरन्स केवळ वैधानिक तरतुदी पूर्ण करतो. वैयक्तिक मालमत्तेच्या कव्हरेजसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर कोणाच्याही हिताचा आहे.
कार इन्शुरन्स घेण्याच्या स्मार्ट टिप्स - आपल्यापैकी अनेकांना वाहनाचा इन्शुरन्स हा केवळ पोलिसांनी अडवल्यास दाखवण्यासाठी असतो असं वाटतं. त्यामुळे बहुतेक लोक कमी पैशातील 'थर्ड पार्टी इन्शुरन्स' निवडतात.
थर्ड पार्टी इन्शुरन्स कमी खर्चात मिळत असला तरी त्यातून मिळणारे लाभ फारच कमी असतात. म्हणजे मोठा अपघात होऊन कोणाला गंभीर दुखापत झाली किंवा मृत्यू झाला, अशावेळी नुकसान भरपाई मिळते.
त्याच्या उलट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन हा 800 ते 1200 रुपयांनी महाग असतो. पण, त्यातून मिळणारे लाभही जास्त असतात. यामध्ये वाहनाची IDV किंमत ठरवली जाते. अपघात झाला तर दुरुस्तीचा खर्च कंपनी करते (टक्के ठरलेले असतात 70,60,50 इ.)
गाडी चोरीला गेली, अपघात झाला किंवा उभारल्या ठिकाणी जळून गेली, भूंकप, पूर, जमावाचा हल्ला (आंदोलन इ.) अशा गोष्टी घडल्यास IDV किंमत किती आहे ती मालकाला मिळते. IDV किंमत म्हणजे उदा. वॅगनार VXI 2010 मॉडेल कार आहे, तर तिची IDV किंमत कंपनीने 1.30 ते 1.90 लाखापर्यंत ठरवलेली असते. अपघात झाल्यास चालकाला अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई मिळते. शिवाय थर्ड पार्टी प्लॅनमध्ये मिळणारे सर्व प्लॅन कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनमध्ये मिळतातच.
त्यामुळे ज्यांची कार 5 ते 6 वर्षे जुनी झाली आहे, त्यांनी इन्शुरन्स घेताना कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनच निवडावा. उंदीर हे अनेकांच्या कारचे खर्च काढतात. उंदरांमुळे झालेले नुकसानही कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनमध्ये कव्हर होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती वाहन विम्याच्या सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी वाहन विमा सल्लागाराशी/कंपनीशी संपर्क साधा)