मान्सून सुरू झाला की महाराष्ट्रातील विविध पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी जमू लागते. अहमदनगर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा असतो.
अकोले शहरापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे भंडारदरा धरण आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे.
पावसामुळे भंडारदरा परिसरातील निसर्ग हिरवाईने नटलेला आहे. अनेक ओढे, नाले, धबधबे प्रवाहित झाले असून निसर्गाचं हे रूप अनेकांना आकर्षित करतंय.
हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड, रंधा धबधबा, सांदन दरी तसेच अलंग, कुलंग, मलंग यांसारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे या परिसरात आहेत. अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या मार्गामध्ये असणाऱ्या भंडारदरा परिसरामध्ये सध्या पर्यटकांनी गर्दी केली आहे.
नाशिक, पुणे, मुंबई यांसारख्या मोठमोठ्या शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात.
पर्यटनाच्या दृष्टीने सुसज्ज असणाऱ्या अकोले येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अकोले, कोतुळ, रंधा, भंडारदरा, शेंडी, राजूर याठिकाणी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.
या पर्यटन स्थळांवर मुक्कामी जाणाऱ्या पर्यटकांसाठी टेन्टची देखील सेवा उपलब्ध आहे. पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एक परिपूर्ण जागा म्हणून अकोले तालुक्याची ओळख आहे.