हंपीसाठी ही अभिमानाची बाब आहे की, येथील अनेक मंदिरे आणि स्मारके युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यात आली आहेत.
तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले हंपी सुंदरच नाहीतर इतिहासाने समृद्ध आहे. हंपी हे 7 व्या शतकातील हिंदू विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठीही प्रसिद्ध आहे.
वास्तुविशारदाच्या कल्पनेतून जगप्रसिद्ध शिल्पांनी सजलेली सारी नगरी इथं जशीच्या तशी उभी आहे. हंपी आणि महाराष्ट्राचं तर वेगळं नातं सांगितलं जातं.
सकल महाराष्ट्राचा पांडुरंग अर्थात विठ्ठलाची हिच तर भूमी. हंपी मधील विठ्ठल मंदिर पाहताना असंच काहीसं वाटत होतं. या विठ्ठल मंदिराबद्दल दोन आख्यायिका प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की विठ्ठलाने राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नांमध्ये घेऊन त्यांना आपली मूर्ती पुन्हा एकदा पंढरपुरला स्थापन करण्यास सांगितले. तर इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपुरात नेऊन लपवला अशीही एक दंतकथा सांगितली जाते. म्हणूनच कानडा राजा पंढरीचा, असेही तुम्ही अभंगातून ऐकलं असेलच.
हंपीचे विठ्ठल मंदिर 16व्या शतकात बांधले गेले. हे त्या भागातील सर्वात सुंदर मंदिर आहे. हे विजयनगरच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुना आहे. भव्य कोरीव कामात साकारलेलं हे मंदिर हंपीतील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. विठ्ठल मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रांगणात असलेला भव्य दगडी रथ.
हंपी ही विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी होती. हे दक्षिण भारतातील महान राज्यांपैकी एक होतं. तिथल्या श्रीमंत राजांनी अनोखी मंदिरे आणि राजवाडे बांधले होते, ज्यांना 14व्या आणि 16व्या शतकात दूरदूरच्या प्रवाशांनी भेट दिली होती.
हंपी नंतर लुटीने उद्ध्वस्त झाले असले तरी इथं अजूनही 1600 पेक्षा जास्त इमारती आहेत, ज्यात राजवाडे, किल्ले, स्मारक संरचना, मंदिरे, स्तंभ असलेले सभागृह आणि कॉरिडॉर यांचा समावेश आहे.
डिसेंबरमध्ये या मंदिराची मुख्य देवता विठ्ठलाचा विवाह सोहळा साजरा केला जातो. यावेळी हजारो लोकं येथे येतात. इथं भेट देण्याचा आणखी एक चांगला काळ म्हणजे फेब्रुवारी, जेव्हा वार्षिक रथ-उत्सव साजरा केला जातो.