महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच अनेकजण पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतात. पावसाळी पर्यटन म्हटलं की अनेकांची पहिली पसंती कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना असते. आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच 10 प्रमुख पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.
पन्हाळा हा कोल्हापूरच्या पावसाळी पर्यटनातला मुकुटमणी मानला जातो. मुळातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांना बघण्यासाठी बरेचशी ठिकाणे असल्यामुळे पावसाळ्यात पन्हाळ्याला आवर्जून भेट द्यावी.
पन्हाळ्याच्या भेटीनंतर कोल्हापुरातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि थंड हवेचे ठिकाण असे दोन्ही असलेले पर्यटनस्थळ म्हणजे वाडी रत्नागिरीचे श्रीक्षेत्र जोतिबा. पावसाळ्यात या ठिकाणचा माहोल अगदी बघण्यासारखा असतो.
दाट धुके, रिमझिम पाऊस आणि 10 पठारांचे मिळून बनलेले विस्तीर्ण असे मसाई पठार. मसाई पठार हे कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला 30 किमी अंतरावर असलेले पठार आहे. पावसाळ्यानंतर या ठिकाणी उगवणाऱ्या वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांसाठी हे पठार ओळखले जात असले तरी पावसाळ्यात देखील या ठिकाणी पर्यटक आवर्जून येत असतात.
नाथपंथीय गैबीनाथांचे मुळ स्थान असलेल्या गगनगड येथे गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. गगनगडावर पश्चिमेकडे दिसणाऱ्या खोल दर्या, दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा, कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा, तसेच बाजूलाच राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा आहे. कोकणातून येणाऱ्या ढगांमुळे पावसाळ्यात हे सर्व दृष्य विलोभनीय दिसते.
खरंतर गगनबावडा हे ठिकाण महाराष्ट्राचे चेरापूंजी म्हणून ओळखले जाते. याच गगनबावड्यात सन 1968 पासून करुळ घाटातून वाहतुक सुरू आहे. कोल्हापूर-विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात हा 13 कि. मी. अंतराचा घाट आहे. पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना अनेक नयनरम्य दृश्ये पहावयास मिळतात.
निसर्गसौंदर्याने नटलेला राधानगरी तालुका आणि पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या, धबधबे मनाला मोहून टाकतात. त्यापैकीच एक राऊतवाडी हा प्रसिद्ध धबधबा आहे. कोल्हापूर शहरापासून हा धबधबा 55 किलोमीटर, तर राधानगरी मधून फक्त साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे. जवळपास दीडशे फूट उंचीवरून पडणारे जलप्रपात पाहून मन थक्क होऊन जाते.
कोल्हापूर पासून 70 किलोमीटरवर असणाऱ्या आंबा घाटातून आपल्याला मार्लेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी जाता येते. घाटामध्ये उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे, या मंदिरामध्ये गायमुख आहे. तर गायमुखावर श्री गणेशाची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आहे. या ठिकाणचे वातावरण अगदी आल्हाददायक असते. पावसाळा व हिवाळा या ऋतुंमध्ये सकाळच्या वेळी भरपुर धुके या घाटात पाहायला मिळते.
सहयाद्रीच्या डोंगररांगावर वसलेला विशाळगड हा किल्ला कोकण आणि घाटमाथ्याल्या जोडणाऱ्या अणुस्करा व आंबा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिलाहार काळात बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर या किल्ल्याचे खेळणा वरून विशाळगड असे नामकरण केलं. गडावर बस किंवा खाजगी वाहनानं जाता येतं. आपला दैदिप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी या ठिकाणी एकदा जरुर भेट दिली पाहिजे.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात असणारा हा धबधबा हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहातून पुढे प्रवाहित होतो. या धबधब्याशेजारी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आजरा तालुक्यात पर्यटन स्थळांतील रामतीर्थ हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पावसाळ्यात या सुरक्षित धबधबा पाहण्यासाठी आणि मनमुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
कोल्हापूरपासून जवळपास 56 किलोमीटर अंतरावर बर्की धबधबा आहे. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 3 किमीचा छोटा ट्रेक करावा लागतो. यावेळी वाटेत पावसाळ्यात हिरवी शाल पांघरलेले डोंगर, दर्या, ओढे-नाले असे मनमोहक दृष्य नजरेस पडते. शाहुवाडी तालुक्यात असणारा हा धबधबा एरवी फारशा वर्दळीचा नसतो. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक हमखास गर्दी करत असतात.