व्हॉट्सअॅप सर्व वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीनं यामध्ये नवीन फीचर्स दिल्यानं त्याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. युजर्सची सोय लक्षात घेऊन अॅपमध्ये विविध नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. दरम्यान, व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन फीचर आणणार आहे जे वापरकर्त्यांना पाठवलेले संदेश एडिट करण्यास अनुमती देईल.
WABetaInfo ने माहिती दिली आहे की, व्हॉट्सअॅप एका मेसेज एडिटिंग फीचरवर काम करत आहे, ज्याला मेसेज एडिट असे नाव दिले जाऊ शकते. जेव्हा वापरकर्ते चुकीचं लिहून घाईघाईत मेसेज पाठवतात तेव्हा हे फीचर खूप उपयोगी पडेल. हे फीचर सुरू झाल्यानंतर युजर्सना त्यांच्या चुका सुधारता येणार आहेत.
WB नं सांगितलं की, सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजवर आहे, म्हणजेच त्यावर काम केलं जात आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा अँड्रॉइड 2.22.20.12 अपडेटमध्ये दिसलं आहे.
असं मानलं जातं की ते येत्या अपडेट्ससह रोल आउट केले जाईल. परंतु हे वैशिष्ट्य प्रथम बीटा टेस्टर्ससाठी सादर केले जाईल.
सध्या हे फीचर कसं काम करेल याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र संपादित संदेशासमोर 'एडिट' असं लेबल असू शकतं, असं मानलं जात आहे. तसेच, काही कालावधीत पाठवलेला संदेश संपादित करण्याची परवानगी मिळणे अपेक्षित आहे.